आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 हजार अमेरिकींना मिळणार रोजगार, इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इन्फोसिस ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची भारतीय कंपनी  पुढील दोन वर्षांत १० हजार अमेरिकी नागरिकांना नोकऱ्या देणार असून अमेरिकेत चार टेक हबही सुरू करणार आहे. अमेरिकी कार्मचाऱ्यांच्या नोकऱ्या हिसकावणाऱ्या आउटसोर्सिंग कंपन्यांवर बडगा उगारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला खुश करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

चारपैकी कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्र शिकवणसाठीचे पहिले नवोन्मेष केंद्र येत्या ऑगस्टमध्ये इंडियानामध्ये सुरू केली जातील. अमेरिकीचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांचे हे राज्य आहे. या केंद्रांतून २०२१ पर्यंत २००० अमेरिकी नागरिकांना रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे, असे इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांनी सांगितले. उर्वरित तीन नवोन्मेष केंद्रांची ठिकाणे येत्या काही महिन्यांत निश्चित केली जातील. या टेक हब म्हणजेच नवोन्मेष केंद्रांतून लोकांना केवळ तंत्रज्ञान व नवोन्मेषाचे प्रशिक्षण दिले जाणार नाही तर वित्तीय सेवा, उत्पादन, आरोग्य सेवा, किरकोळ विक्री व ऊर्जा आदी उद्योग क्षेत्रातील ग्राहकांशी सुलभतेने काम करण्याचे कौशल्यही शिकवले जाणार आहे. जगभरात इन्फोसिसचे २ लाख कर्मचारी आहेत. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने व्हिसा नियम कठोर केल्यामुळे अमेरिकेत अभियंते पाठवणे खर्चिक बनल्यामुळे स्थानिकांना जास्तीत जास्त नोकऱ्या देण्याचा इन्फोसिसचा प्रयत्न आहे. अमेरिकेत इन्फोसिसचा कर्मचारी खर्च वाढल्याचेही या निर्णयातून स्पष्ट होते.

अमेरिकेतील कठोर व्हिसा नियमांची केवळ खानापूर्ती करण्यासाठी ही पावले उचलली नसल्याचे सिक्का यांनी स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांपासून कृत्रिम बुद्धिमत्ता, व्हर्च्युअल रिअॅलिटीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. पारंपरिक प्रकल्पही ऑटोमेटेड झाले आहेत. काम अधिक पुढच्या पिढीचे बनल्यामुळे स्थानिक व जागतिक बुद्धिमत्तेचे मिश्रण करणे गरजेचे बनले आहे, असे ते म्हणाले.

कठोर व्हिसा नियम, संरक्षणवादामुळे पाऊल :  मागील काही आठवड्यांपासून अमेरिकेसह जगभरातील बाजारपेठांमध्ये संरक्षणवादाची भावना वाढीस लागली आहे. अमेरिकेसह सर्व देशांत स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून परदेशी कर्मचाऱ्यांसाठीचे व्हिसा नियम कठोर केले जात आहेत.

उत्तर अमेरिकेचा ६० टक्के वाटा :  उत्तर अमेरिकेच्या बाजारपेठेत इन्फोसिसचा ६० टक्क्यांहून अधिक वाटा असून २०१६-१७ मध्ये इन्फोसिसला येथून १०.२ अब्ज अमेरिकी डॉलर महसूल मिळाला आहे.

हेराफेरीचे आरोप :  अमेरिकेने इन्फोसिस आणि तिची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने एच-१ बी व्हिसाचा मोठा भाग हस्तगत करण्यासाठी अनुचित मार्गांचा अवलंब केल्याचा आरोप केला आहे. या कंपन्या लॉटरी प्रणालीत अतिरिक्त तिकिटे घेऊन एच-१ बी व्हिसाचा मोठा वाटा बळकावतात, असाही अमेरिकेचा आरोप आहे. अमेरिका दरवर्षी ६५,००० एच-१ बी व्हिसा जारी करते.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...