आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज 40 टन फळे, भाज्या आसामकडे पाठवण्याची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आठवडी भाजीपाला-फळबाजाराला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाल्यानंतर  शेतकऱ्यांच्या उत्पादनाला महाराष्ट्राबाहेरही बाजारपेठ मिळावी यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू अाहेत. यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेतला असून महाराष्ट्रातील ४० टन फळे, भाज्या रेल्वेने रोज अासामकडे पाठवण्याचे नियाेजन अाहे. प्रायोगिक तत्त्वावरील ही याेजना यशस्वी झाल्यास पश्चिम बंगालमध्येही नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूरची शेती उत्पादने रेल्वेने पाठवण्यात येतील.    

खोत यांनी नुकताच आसाम व पश्चिम बंगालचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी या दोन्ही राज्यांच्या मार्केट कमिटीला भेट दिली. महाराष्ट्रातील कोणत्या फळांना, भाज्यांना तेथे मागणी आहे, याविषयी चर्चा झाली. डाळिंब, द्राक्षे, बेदाणे, कांदा, टोमॅटो तसेच काेंबड्यांच्या अंड्यांना  तेथील मागणी लक्षात घेता सुरुवातीला नाशिकमधील शेतकऱ्यांच्या कंपन्यांचे उत्पादन पाठवण्याचा विचार केला जात आहे.    

आसाम, पश्चिम बंगालच्या कृषी बाजार समितीशी चर्चा केल्यानंतर खोत यांनी याविषयीची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली. याबाबत आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी  प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना कृषी, पणन सचिव यांना दिल्या. आता हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला असून रेल्वे वाहतुकीविषयी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा झाली आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वेला बोगी जोडून यामधून शेती उत्पादन पाठवण्याचे नियाेजन अाहे.  
शेतकऱ्यांच्या कंपन्यांना या प्रयोगात समाविष्ट करून घेतले जाणार असून त्यात व्यापारी, आडत्यांना स्थान नसेल. शेतकऱ्यांच्या खिशात दोन जास्तीचे पैसे जमा झाले पाहिजेत, यासाठी हा प्रयत्न अाहे.  प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आसाम, पश्चिम बंगालनंतर  इतर राज्यांमध्येही रोज महाराष्ट्रातून फळे, भाज्या पाठवण्यात येतील. 
 
मैदानांत आठवडी बाजार   
शेतकऱ्यांची उत्पादने थेट ग्राहकांना मिळावी, यासाठी आठवडी बाजार सुरू करण्यात आले असून या प्रयाेगाला शहरांमध्ये बऱ्यापैकी प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली आहे. मात्र बऱ्याच
ठिकाणी जागेची अडचण येत आहे. महानगरपालिका, नगर परिषदांच्या मैदानांत हा बाजार भरवण्यात यावा, यासाठीचे आदेश देण्यात आले आहेत.    
 
गोदामासाठी अल्पदरात कर्ज   
शेतकऱ्यांना शेतीमाल ठेवण्यासाठी गोदामांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या कंपन्यांना पणन िवभागाकडून कर्ज देण्याची तयारी सुरु आहे. याकरिता ६५ टक्के कर्ज देऊन त्यावर फक्त ६ टक्के व्याज आकारण्यात येईल.  ६ टक्क्यांपैकी ३ टक्के व्याज पणन िवभाग स्वत: भरणार असल्याने शेतकरी कंपन्यांना त्याचा फायदाच होईल, असे खोत म्हणाले.