आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जनधन’च्या भरपाईसाठी इतर खात्यांवर दंड : भट्टाचार्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - बचत खात्यात निश्चित पैसे ठेवले नाहीत तर अशा खात्यांवर दंड लावण्याचा निर्णय योग्यच असल्याचा दावा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांनी केला आहे. जनधन खात्यांवर येणाऱ्या खर्चाची भरपाई करण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यकच होते, असे मतही त्यांनी मांडले आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासंबंधी सरकारच्या वतीने अधिकृत सूचना मिळालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. अशा काही सूचना आल्यास त्यावर विचार करता येईल, असेही त्या म्हणाल्या. महिला उद्योजकांसाठी आयोजित राष्ट्रीय परिसंवादानिमित्त त्या पत्रकारांशी बोलत होत्या. देशातील सर्वात मोठी बँक, एसबीआयने गेल्या आठवड्यातच एक एप्रिलपासून खात्यावरील किमान मर्यादेवर दंड आकारणार असल्याची घोषणा केली होती. याव्यतिरिक्त इतरही काही सुविधांवर बँकेने शुल्क लावणार असल्याची घोषणा केली होती.  

कमाल मर्यादेवरील दंडाचा नियम जवळपास सर्वच बँकांमध्ये असल्याचे भट्टाचार्य यांनी सांगितले. त्यात एसबीआयचा दंड सर्वात कमी आहे. या दंडाची तरतूद आधीपासून होती. मात्र, २०१२ मध्ये हे शुल्क माफ करण्यात आले होते.
 
सामान्य कुटुंबांना एका महिन्यात चार वेळेपेक्षा जास्त वेळेस पैसे काढण्याची गरज पडत असेल, असे मला वाटत नसल्याचे अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीलाच जास्त प्रमाणात नगदी पैशांची आवश्यकता असते. अशा व्यावसायिकांनी व्यवहार करण्यासाठी मोबाइल आणि इंटरनेटसारख्या दुसऱ्या पर्यायांचा वापर करावा, अशी आमची इच्छा असल्याचे मतही त्यांनी मांडले. 
बातम्या आणखी आहेत...