आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच चाखणार भारतातून आयात आंब्याची चव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न/नवी दिल्ली- ऑस्ट्रेलियातील लोक पहिल्यांदाच भारतीय हापूस आणि केसर या जातीच्या आंब्यांचा आस्वाद घेऊ शकणार आहेत. ऑस्ट्रेलियाने आशियातून आयात होणाऱ्या फळांच्या नियमात (प्रोटोकॉल) दुरुस्ती केली आहे. याअंतर्गत ज्या आंब्यांना निर्यातीआधी संक्रमणमुक्त करण्यात आले आहेत, त्याच आंब्याला ऑस्ट्रेलियात आयात करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियन आंबा उद्योग असोसिएशनचे मुख्य कार्याध्यक्ष रॉबर्ट ग्रे यांनी ही माहिती दिली.  
 
ऑस्ट्रेलियातील आंब्यांचा सीझन संपल्यानंतर भारतीय आंब्यांची विक्री करण्यात येणार असल्याचे ग्रे यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, जागतिक व्यापारामध्ये भागीदार होण्यासाठी जर आम्ही ऑस्ट्रेलियातील आंबे इतर देशांत निर्यात करण्याचा विचार केला, तर आम्हालाही प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. त्याचप्रमाणे आमच्या देशात येणारी फळे सुरक्षित असावी तसेच कीटकनाशके किंवा आजार घेऊन येऊ नयेत, अशी आमची इच्छा आहे. या नियमानुसारच आम्ही इतर देशांना आमच्या बाजारात येण्याची परवानगी देऊ शकतो.’  
 
अॉस्ट्रेलियाने अलीकडच्या काही वर्षांतच मेक्सिको, फिलिपाइन्स आणि पाकिस्तानमधून आंब्याची आयात सुरू केली आहे. ग्रे यांनी सांगितले की, भारत एक मोठा अांबा उत्पादक देश आहे. भारताची आंबा निर्यातही आमच्याप्रमाणेच आहे. भारताने अमेरिकेलाही निर्यात सुरू केली आहे. मात्र, भारत किती प्रमाणात आंबा ऑस्ट्रेलियात पाठवू शकतो याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.  
 
सरकारी अंदाजानुसार या वर्षी भारतात १९२.१ लाख टन आंब्याचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी झालेल्या १८६ लाख टनांपेक्षा या वर्षीचे उत्पादन ३.२८ टक्के जास्त होण्याचा अंदाज आहे. यामुळे आंबा निर्यातक शेतकऱ्यांना चांगला फायदा होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील कोकणसह काही भागात निर्यात होणाऱ्या आंब्यांचे उत्पादन होते.
 
या वर्षी निर्यातीत १० टक्के वाढ 
भारतात आंब्याचा हंगाम मार्च ते जुलैपर्यंत असतो. या वर्षी आंब्याच्या निर्यातीत सुमारे १० टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. चालू आर्थिक वर्षात हा आकडा ५०,००० टनांच्या वरती जाण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा आकडा ४५,७३० टन होता. हा अंदाज कृषी आणि प्रोसेस्ड फूड उत्पादक निर्यात विकास प्राधिकरणाने (एपीडा) व्यक्त केला आहे.
 
या कारणांमुळे वाढेल निर्यात 
• मजबूत मागणी आणि निर्यातयोग्य दर्जाच्या आंब्यांची उपलब्धता 
• या वर्षी झालेले आंब्यांचे चांगले उत्पादन, त्याचबरोबर दर्जादेखील 
• अवकाळी पाऊस, गारपीट किंवा वादळाची कोणतीच सूचना मिळालेली नाही. 
• कोरियासारख्या नव्या बाजारपेठा मिळाल्याने निर्यात वाढण्याची अपेक्षा. 

या महिन्यात २०० टनांपेक्षा जास्त आंब्याची निर्यात 
• अमेरिका       १३१ टन 
• मध्य पूर्व       ४२ टन 
• युरोपीय संघ १८ टन
बातम्या आणखी आहेत...