आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटी हब बंगळुरू कृषीतून उत्पन्न दाखवण्यात आघाडीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाचा आयटी हब म्हणून बंगळुरूची ओळख असली तरी येथील एका गोष्टीमुळे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. कृषीतून होणाऱ्या उत्पन्नाबाबत बंगळुरू देशात पहिल्या क्रमांकावर आहे. आयकर विभागाच्या आकडेवारीवरून हा खुलासा झाला आहे.

आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार वर्ष २००८-०९ ते २०१५-१६ दरम्यान बंगळुरूमधील ३२१ लोकांनी शेतीतून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न झाले असल्याची माहिती आपल्या विवरणपत्रात दिली आहे. यात बंगळुरूनंतर दिल्ली, कोलकाता, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, तिरुअनंतपुरम आणि कोच्ची या शहरांचा समावेश आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी
शेती अत्यल्प आहे, त्याच ठिकाणी शेतीतून होणारे उत्पन्न जास्त आहे. देशात कृषीतून होणाऱ्या उत्पन्नावर आयकर लागत नाही.

या प्रकरणात पाटणा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यात काळा पैसा पांढरा करण्यासाठी कृषीमध्ये जास्त उत्पन्न दाखवण्यात आले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. यावर सीबीडीटीने २० मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सीबीडीटीने आयकर अधिकाऱ्यांना २०११-१२ ते २०१३-१४ मध्ये दाखल करण्यात आलेल्या आयकर विवरणानुसार चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार २००७-०८ पासून २०१५-१६ दरम्यान नऊ वर्षांत २,७४६ लोकांनी शेतीतील उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा जास्त दाखवले आहे.

जनता दल (यु.), समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाच्या वतीने मंगळवारी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावर जास्त कृषी उत्पन्न दाखवणाऱ्या अनेक उच्चपदस्थ लोकांची चौकशी सुरू असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. चौकशीनंतर कोणाचेही नाव समाेर आल्यास याला "राजकीय सूड' असे नाव देऊ नका, असा खोचक टोलाही जेटली यांनी लावला. खासदारांनी वारंवार विचारल्यावरही या प्रकरणात कोणाचेही नाव सांगण्यास त्यांनी नकार िदला. अर्थमंत्र्यांनी यात कोणाची नावे आहेत अशी "धमकी' देण्याऐवजी सरळसरळ अशा लोकांची नावे जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केली.
२,००० लाख कोटी रुपये लपवले
कृषीमधून होणारे उत्पन्न दाखवत देशातील लोकांनी २००० लाख कोटी रुपये लपवले असल्याचा आरोप जदयू नेते शरद यादव यांनी काही अहवालांचा हवाला देत केला. देशाच्या जीडीपीचा विचार केल्यास त्या तुलनेत ही सुमारे १५ टक्के रक्कम आहे. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी बसपच्या प्रमुख मायावती यांनी केली. या प्रकरणाच्या आड सरकार कृषीवर कर लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सपाचे रामगोपाल यादव यांनी केला. यावर कृषीवर कर लावण्याचा सरकारचा विचार नसल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले.
सर्वात जास्त कृषी उत्पन्न असणारी शहरे

शहर एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्न
बंगळुरू 321
दिल्ली 275
कोलकाता 239
मुंबई 212
पुणे 192
चेन्नई 181
हैदराबाद 162
तिरुवनंतपुरम 157
कोची 109
बातम्या आणखी आहेत...