आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकिंग, निर्यातीसह ऑटो क्षेत्रातील शेअरमध्ये उत्पन्नाची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोटाबंदीनंतर भारतातील उत्पन्नाच्या परिदृश्यात पूर्णपणे बदल झाला आहे. बँकेमध्ये जमा रक्कम मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे व्याजदरात घट करण्यासाठीचा दबाव वाढला आहे. व्याजदरात कपातीचा निर्णय कर्ज घेणाऱ्यासाठी चांगला असला तरी बचत करणाऱ्यांसाठी योग्य नाही. त्यामुळे लवकरच पोस्टातील बचत योजनेवरील तसेच बचत खात्यावरील व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षात गुंतवणुकीसाठी सर्वोत्कृष्ट पर्याय शेअर आणि इक्विटी फंड हाच आहे. मी याचा उल्लेख गेल्या आठवड्यात याच कॉलममध्ये केला होता. २०१७ मध्ये शेअरच्या दृष्टीने कोणकोणत्या क्षेत्रातील प्रदर्शन चांगले राहील? हाच आता सर्वात मोठा प्रश्न आहे.  
बँकिंग शेअरमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. नोटाबंदीनंतर या क्षेत्रातील शेअरमध्ये चांगली आणि लवकरच वाढ होईल. बँकांमधील अडकलेल्या कर्जाच्या आकड्यांत वाढ होण्याची शक्यता असली तरी बँकेमधील जमा आणि पुन्हा कर्जाच्या व्याजदरात घसरण तसेच बाँडवर यिल्ड कमी झाल्याने नफा वाढेल. 

यामुळे बँकांना एक किंवा दोन तिमाहींमध्ये नफ्यात वाढ होण्यास मदत मिळू शकते. खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये सुधारणा दिसेल. मात्र, एसबीआय, बँक ऑफ बडोदा यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका सकारात्मक आकडेवारी सादर करून आश्चर्याचा झटका देऊ शकतात. आयटी तसेच निर्यात क्षेत्रातदेखील आश्चर्याचा झटका बसू शकतो. मात्र, ऑटोमेशनमध्ये आव्हाने वाढली असून अमेरिकेने संरक्षणवादी धोरणाचा अवलंब केल्यामुळे आयटी क्षेत्रातील चमक गेल्या वर्षभरापासून मंदावली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात व्याजदरात बदल होतील तसेच इन्फ्रास्ट्रक्चरवर एक लाख कोटी डॉलर (सुमारे ६८ लाख कोटी रुपये) खर्च होतील. यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला गती मिळेल. अमेरिकेने आऊटसोर्सिंगच्या विरोधातील नियम कडक केले तरी एकंदरीत व्यवसायात वाढ होईल. अमेरिकी अर्थव्यवस्थेला गती मिळाल्यास अायटी निर्यातदारांसह एकंदरीत निर्यातीला मदत करेल. रुपया कमजोर झाल्यामुळेदेखील निर्यातदारांना फायदा मिळेल. म्हणजेच निर्यातीवर आधारित असलेल्या कंपन्या शेअर बाजारात सकारात्मक वाढ मिळवू शकतात.

अमेरिकेमध्ये नियामकांच्या अडचणीमुळे फार्मा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरवर नकारात्मक परिणाम झाला आहे. या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी सन फार्माचे भांडवली मूल्यदेखील कमी झाले आहे. मात्र, मंदी येवो अथवा न येवो, खाण्या-पिण्याच्या वस्तूंप्रमाणे औषधाची मागणीदेखील कायम राहील. २०१७ मध्ये फार्मा क्षेत्रातील शेअरमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. सरकारने रेल्वे आणि रस्त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्च वाढवल्यास कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील कंपन्यांमध्ये वाढ दिसण्याची शक्यता आहे. एल अँड टीसारख्या स्थापित कंपन्यांच्या शेअरची जास्त किंमत असते तरीदेखील गुंतवणूकदार अशा शेअरलाच पहिली पसंती दर्शवतील.
 
ऑटो क्षेत्र आणि या क्षेत्राला जोडलेल्या उद्योगातील कंपन्यांमध्ये सुधारणा दिसण्याची अपेक्षा आहे. नोटाबंदीनंतर कार, दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांची मागणी विशेषकरुन ग्रामीण भागात कमी झाली आहे. मात्र, खरिपाचे पीक चांगले आल्यास शेतकऱ्यांच्या हातात पैसे येतील, त्यानंतर मागणी वाढेल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळत आहे. यामुळेदेखील २०१७ मध्ये ऑटो क्षेत्रातील मागणीला मजबुती मिळायला हवी. टीव्ही, फ्रिज, मोबाइल फोन आणि लॅपटॉपसारख्या टिकाऊ गृहोपयोगी वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्येदेखील सुधारणा होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसऱ्या सहामाहीदरम्यान या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसण्याची शक्यता आहे.
 
मूल्यावरील नियंत्रण काढल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांच्या शेअरमध्येदेखील सुधारणा दिसून आली आहे. या शेअरमधील तेजी कायम राहत नसली तरी मजबुती कायम राहील. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाल्यामुळे रिफायनिंग कंपन्यांमध्ये आॅइल एक्स्प्लोरेशन कंपन्यांच्या तुलनेत जास्त सुधारणा होण्याची शक्यता आहे. 

रिअल इस्टेट आणि दूरसंचार क्षेत्रातील शेअरपासून शक्यतो  लांब राहणेच योग्य राहील. प्रॉपर्टीच्या व्यवहारातच सर्वात जास्त रक्कम लागत असल्यामुळे नोटाबंदीमुळे रिअल इस्टेट क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. नोटाबंदीचा परिणाम संपल्यानंतरही बेनामी व्यवहारांबाबतच्या नव्या कायद्यामुळे या क्षेत्रावर मंदीचे सावट कायम राहील. म्हणजेच या क्षेत्रात सुधारणा दिसण्याची शक्यता कमीच आहे. यामुळे मालमत्तेच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या क्षेत्रातील गुंतवणूक योग्य ठरणार नाही.

दूरसंचार क्षेत्राचा विचार केल्यास रिलायन्स जिओ आल्यानंतर (जे ३१ मार्चपर्यंत मोफत सेवा देण्याचा दावा करत आहे) काही कमजोर कंपन्यांच्या नफ्यात तेजीने घसरण झाली आहे. याचाच अर्थ पुढील काळात हा बाजार कन्सोलिडेट होईल. कमजोर कंपन्यांचे विलीनीकरण होण्याची शक्यता आहे. डिजिटल पेमेंट आणि इतर डाटा आधारित सेवा वाढण्याचा अर्थ असाही होतो की, दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना आपले नेटवर्क मजबूत करावे लागेल. यामुळे अलीकडच्या काळात त्यांचा नफा कमी होऊ शकतो. या दृष्टीने नजीकच्या काळात दूरसंचार उद्योगातील लाभ प्रभावित होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही दूरसंचार क्षेत्रातील शेअर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जास्त कालावधीसाठी खरेदी करा. तसेच या क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचे शेअर खरेदी करणे योग्य राहील

(टीप : वर व्यक्त केलेल्या अंदाजाकडे कोणतेच शेअर खरेदी किंवा विक्री करण्याची शिफारस म्हणून पाहू नये. गुंतवणूक करण्याआधी वाचकांनी गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्यावी.)
बातम्या आणखी आहेत...