आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयात कर वाढीमुळे परदेशी साखरेचा ‘गोडवा’ महागणार, दोन वर्षांत दुप्पट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
पुणे  - साखरेवरील आयातकर ४० टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर नेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परदेशातून स्वस्तात मिळणारी साखर आयात करून देशांतर्गत बाजारपेठेत विकली जाण्याचा धोका लक्षात घेऊन आयात कर वाढवण्यात आला आहे.
 
यामुळे स्थानिक बाजारपेठेतील साखर दर टिकून राहणे अपेक्षित आहे. कच्ची, पांढरी आणि रिफाइंड अशा कोणत्याही साखरेच्या आयातीवर तातडीने ५० टक्के आयातकर लागू झाल्याची अधिसूचना केंद्रीय अन्न मंत्रालयाने काढली आहे. स्थानिक बाजारातील साखरेचा पुरवठा अखंडित राहण्यासाठी यंदाच्या एप्रिल महिन्यातच केंद्राने ५ लाख टन कच्ची साखर आयात केली होती.  

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने आयात कर वाढवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बाबर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, आयात कर वाढवल्यामुळे देशातील साखरेचे दर टिकून राहतील. कारखान्यांकडील साखरेची मागणी वाढेल. कारण गेल्या सहा महिन्यांत साखर निर्यात न झाल्याने साखर उद्योग देशी व्यापारावरच अवलंबून आहे.  

गेल्या वर्षीच्या समाधानकारक पावसामुळे यंदाच्या साखर उत्पादनात १६ ते २०  टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. यंदा देशात २३५ ते २४५ लाख टन साखर उत्पादन होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादन सुधारल्याचा हा परिणाम असणार आहे. या पार्श्वभूमीवर साखर आयात होऊन देशांतर्गत उत्पादन झालेल्या साखर दरात मंदी न येऊ देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.  दरम्यान, देशातील व्यापाऱ्यांनी ब्राझीलमधून ३ लाख टन साखर आयातीचे करार यापूर्वीच केले असल्याचे सांगितले जाते. मात्र केंद्राच्या आजच्या निर्णयामुळे या साखरेला ५० टक्के आयात कर लागेल. किरकोळ बाजारात सध्या साखरेचे दर ४० ते ५० रुपये प्रती किलो आहेत. कारखाना स्तरावरील साखरेचा दर ३२०० रुपये क्विंटल आहे. आयात कर वाढल्यामुळे या दरात अल्प वाढ होण्याची आशा कारखानदारांना आहे. देशातील साखरेचा वार्षिक खप २४० लाख टन आहे. येत्या हंगामातील साखर उत्पादन आणि गेल्या हंगामातील शिल्लक साखर लक्षात घेता मागणीपेक्षा पुरवठा जास्त राहील, असे सूत्रांनी सांगितले.
 
दोन वर्षांत दुप्पट  
२०१५  मध्ये साखरेवरील आयात कर २५ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेण्यात आला होता. त्यानंतर आता यात आणखी दहा टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. देशातील साखर उत्पादकांची मागणी ६० टक्के आयात कर लावण्याची होती. परदेशातल्या साखर आयातीवरील कर वाढवल्याशिवाय देशांतर्गत बाजार स्थिर राहणार नसल्याचे साखर उत्पादकांचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...