आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीने नकार दिल्यानेच राजकारणात न जाण्याचा निर्णय घेतला: रघुराम राजन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आपण कधीही राजकारणात जाणार नसल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी त्यांनी सांगितलेले कारणही तितकेच मजेशीर आहे. या मुद्द्यावर मी माझ्या पत्नीशी चर्चा केली असून त्यांनी राजकारणात जाण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला असल्याचे राजन यांनी सांगितले. राजन यांना आम आदमी पार्टीने राज्यसभेसाठी प्रस्ताव दिला होता, मात्र त्यांनी नकार दिला असल्याचे वृत्त आले होते.  


नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका साहित्य संमेलनात राजन यांनी सांगितले की, “मला राजकारणात रस नाही. मी रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर असताना लोकांना मला आयएमएफमध्ये पाठवण्याची इच्छा होती आणि आता मी पुन्हा प्रोफेसर बनलो तर लोकांना मला आणखी दुसऱ्या जागी पाहण्याची इच्छा आहे. मी प्रोफेसर म्हणून खूप आनंदी आहे.

 

दिवसात अनेक तास काम करण्यासाठी माझ्याकडे बुद्धी आहे. मला माझे काम आवडते.’  
इतर अनेक मुद्द्यांवरही राजन यांनी मत मांडले. लोकांनी निवडून दिल्यानंतर स्वत:च्या मर्जीने सत्ता गाजवणाऱ्यांसाठी ते म्हणाले की, ‘हे अत्यंत चिंताजनक आहे. समजातील एक भाग त्यांना (सरकार) नेहमीच समर्थन देतो. त्यामुळे चुका होण्याची शक्यता वाढते. तुम्ही जास्तीत जास्त मतदारांचे एेकत नाही. असे केल्यास तुम्ही देशाला चुकीच्या मार्गाने घेऊन जात आहात. सरकारने केवळ समर्थकांची मागणी नाही तर जास्तीत जास्त लोकांचे ऐकायला हवे. त्यामुळे कमीत कमी चुका होतील.’


आकडेवारी समाेर आल्यानंतरच नोटबंदीचा परिणाम स्पष्ट होणार असल्याचे राजन यांनी सांगितले. कर चोरी पकडण्यात कर अधिकाऱ्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले. जी माहिती जमा करण्यात येत आहे त्यावर कोणतीही शत्रुत्वाची भावना न ठेवता तपास करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी कारवाईच्या नावाखाली होत असलेल्या त्रासावर स्पष्ट केले. आपल्या देशातील कर व्यवस्था सुधारण्याची गरज आहे. ते करताना एका मर्यादेपर्यंत आपण दबाव न टाकताही करू शकतो, असे ते म्हणाले.  

 

टोकाचा राष्ट्रवाद आर्थिक विकासासाठी हानिकारक : राजन

लोकांना आकर्षित करणारा राष्ट्रवाद आर्थिक विकासासाठी नुकसानदायक असल्याचे राजन यांनी सांगितले. हा भेदभाव बहुसंख्याक समुदायाला उत्तेजित करतो. तक्रारीच्या या भावनेचा लोक गैरफायदा घेतात. आरक्षण याचेच उदाहरण आहे. “पॉप्युलिस्ट नॅशनॅलिझम’ जगभरात असून भारतही त्यापासून दूर नाही. ते म्हणाले की, “रोजगाराची समस्या सुटायला हवी हे महत्त्वाचे आहे. बहुसंख्याक समजातील तक्रारी वाढवून सांगता येत नाहीत. कारण अल्पसंख्याक अनेक वर्षांपासून भेदभावाचा सामना करत आहेत.’ सध्या राजन त्यांच्या पुढील पुस्तकावर काम करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...