आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणुकीचा मोठा हिस्सा हा नेहमी तरल पर्यायात असावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुंतवणूक वैविध्य (रिट्स)
कागदावर अनेक गुंतवणूक पर्याय हे वैविध्याची समृद्धी जपण्यासाठी असले, तरी त्यांचे फायदे-तोटे ध्यानात घेतले पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत शेअर्स व म्युच्युअल फंड हे आदर्श पर्याय ठरतात आणि या पर्यायांतही निवडीचे बहुविध प्रकार उपलब्ध आहेत. पैशाने पैसा वाढत असल्याचे पाहायचे असेल तर गुंतवणूक मार्ग अनुसरावाच लागेल; पण गुंतवणूक धसमुसळेपणाने न होता, पुरेसा वेळ देऊन, निरीक्षण व अभ्यासपूर्वक केली जायला हवी.

उज्ज्वल भवितव्यासाठी संपत्ती निर्माणाचे महत्त्व आता चांगलेच पटले आणि उमगलेही आहे; पण हे संपत्ती निर्माण कसे साध्य करावे, हे अद्याप पुरते समजलेले नाही. गुंतवणूक-भांडार (पोर्टफोलियो) आणि गुंतवणूक वैविध्य (असेट अलोकेशन) हे कसे केले जाते हे आपल्या आर्थिक नियोजनात अतिशय महत्त्वाचे ठरते. असेट अलोकेशन म्हणजे आपल्यापाशी असलेल्या गुंतवणूकयोग्य वरकडीचे उपलब्ध गुंतवणुकीच्या विविध पर्यायांत करावयाचे विभाजन होय. उदाहरणार्थ, समभाग, म्युच्युअल फंड, कलात्मक वस्तू, पंेटिंग्ज, स्थावर मालमत्ता, सोने व चांदी यापैकी गुंतवणूक पर्याय निवडून त्यात गुंतवणूक करणे, पण ही निवड करताना दोन कळीच्या पैलूंना जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ते म्हणजे तरलता गुंतवणूक व विक्री खर्च होय.

- लिक्विडिटी अर्थात तरलता :
आणीबाणीप्रसंगी आपण गुंतवलेली रक्कम मोडावी लागेल तेव्हा तशी सहजतेने करता येण्याची सोय हवी, याला लिक्विडिटी अर्थात तरलता म्हणतात. पण अशी तरलता नसेल वा तिला अल्प वाव असेल, तर गुंतवणूक मोडणे खूप खर्चिक ठरेल. उदाहरणार्थ, घर अथवा जमीन यासारखी स्थावर मालमत्ता तुम्ही खरीदली असेल आणि तुम्हाला पैशाची गरज असताना ती विकताना कोणी खरेदीदार नसेल तर प्रसंगी तूट सोसून ती स्वस्तात विकणे भाग पडते. त्याचप्रमाणे आर्ट अथवा पेंटिंग्जना अपेक्षित किंमत हवी असेल तर पुरता वेळ द्यावा लागतो. त्यामुळे गुंतवणूक वैविध्य जपताना लक्षात घ्यावयाची बाब म्हणजे तुमच्या गुंतवणुकीचा मोठा हिस्सा हा तरल पर्यायात असावा. जेणेकरून घाईगडबडीत असे काही विकावे लागण्याचा प्रसंग येऊ नये, जे तुम्ही निर्माण केलेल्या संपत्तीचा घास घेईल.

- जोखीम घटक आणि क्षमता :
व्यक्तीगणिक जोखीम घटक हा वेगवेगळाच असतो. हा व्यक्तीचे वय, विद्यमान उत्पन्न क्षमता, तिच्यावरील अवलंबितांची संख्या, त्याचप्रमाणे गुंतवणुकीतून होणाऱ्या प्राप्तीचे हिस्सेदार वगैरे. यातून प्रत्येकाची धोके पचविण्याची क्षमता निश्चित होत असते. त्यामुळे जरी दोन व्यक्ती एकाच वयाच्या असल्या तरी वर उल्लेखलेल्या अन्य घटकांचा प्रभाव पाहता त्यांची जोखीम क्षमता वेगवेगळी असू शकेल. तुमचे गुंतवणूक वैविध्य कसे असेल याची तड लावणारा, जोखीम क्षमतेबाबत निर्णय लावणारा प्रमुख निकष म्हणजे, तुमच्याकडे असणारी गुंतवणूकयोग्य वरकड आणि तुम्ही कमावते नसेल तेव्हा उत्तर आयुष्यासाठी तुम्ही अपेक्षिलेला कोश होय.

- मनी मार्केट योजनांमध्ये पैसा विभागता येईल :
गुंतवणूक विभाजनाचे तुलनेने तरल पर्याय- समभाग आणि म्युच्युअल फंडांकडे वळू या. तुमच्या पोर्टफोलियोत या पर्यायांची हिस्सेदारी अंगभूतच सर्वाधिक असायला हवी. या पर्यायातही वैविध्य जपताना, समभाग आणि रोखे बाजाराशी संबंधित योजनांसह म्युच्युअल फंडांच्या स्थिर उत्पन्न योजना आणि मनी मार्केट योजनांमध्ये पैसा विभाजता येईल. सर्वोत्तम तरलता असलेले हे पर्याय आहेत. नजीकच्या भविष्यात स्थावर मालमत्ता क्षेत्र हे व्यक्तिगत गुंतवणूकदारांसाठी “रिट्स (REITS)”द्वारे जेव्हा खुले होईल, ही म्युच्युअल फंडांच्या धर्तीवर चालणारी योजना असल्याने तरलता आणि कायदेशीर बाबींच्या पूर्ततेचा प्रश्नही उपस्थित होणार नाही. कदाचित आणखी दोनेक वर्षांनी या योजनेचे नियम व आराखडा प्रत्यक्ष समोर येईल. कागदावर अनेक गुंतवणूकपर्याय हे वैविध्याची समृद्धी जपण्यासाठी असले तरी त्यांचे फायदे-तोटे ध्यानात घेतले पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत शेअर्स व म्युच्युअल फंड हे आदर्श पर्याय ठरतात आणि या पर्यायातही निवडीचे बहुविध प्रकार उपलब्ध आहेत. पैशाने पैसा वाढत असल्याचे पाहायचे असेल तर गुंतवणूक मार्ग अनुसरावाच लागेल. पण गुंतवणूक धसमुसळेपणाने न होता, पुरेसा वेळ देऊन, निरीक्षण व अभ्यासपूर्वक केली जायला हवी. सर्वात महत्त्वाचे गुंतवणुकीत विविधता म्हणजे तुमचा पैसा वेगवेगळा पर्यायात संतुलित स्वरूपात गुंतला गेला पाहिजे. यालाही एक पर्याय आहे तो म्हणजे या संबंधाने तज्ज्ञ सल्लागाराची मदत मिळवा.

चक्रवाढीचे बळ (पॉवर ऑफ कंपाउंडिंग)
अर्थात तुम्ही गुंतवणुकीसाठी देत असलेला वेळ किती, कोणत्या गुंतवणुकीतून तुम्ही किती परतावा दर अपेक्षित धरला आहे आणि चक्रवाढीचे बळ (Power of Compounding) मिळाल्याने साधला जाणारा परिणाम या बाबी महत्त्वाच्या ठरतात. या दृष्टिकोनातून मग आपण एक-एक गुंतवणूक पर्याय आजमावून पाहू. जसे सोन्याबद्दल आकर्षण हे सर्वश्रुत आहे, पण सोने आपल्या नियमित काही उत्पन्न कमावून देत नाही, तर ते केवळ प्रत्यक्ष खरेदी मूल्यात वृद्धी अथवा घसरण साधते. भारतात सोन्याच्या गुंतवणुकीला आणखी दोन घटक लक्षात घ्यावे लागतील. एक म्हणजे त्या त्या वेळी असणाऱ्या रुपयाचे अमेरिकी डॉलरशी असणारे विनिमय मूल्य आणि आयात शुल्काचा दर होय. कुठल्याही आदर्श आर्थिक नियोजनात तयार केल्या जाणाऱ्या गुंतवणूक भांडारात खरे तर सोन्याला काहीच स्थान नसावे. कारण ते निश्चित उत्पन्न मिळवून देणारे साधन नाही. जर तुमच्या मालकीचे आधीच काही सुवर्ण साठा असेल, तर सरकारकडून प्रस्तावित सोने चलनीकरण आणि सुवर्ण रोखे योजना या पर्यायांचा विचार करता येईल.
- स्थावर मालमत्ता क्षेत्र हे व्यक्तिगत गुंतवणूकदारांसाठी रिट्सद्वारे खुले होईल
- गुंतवणूक-भांडार (पोर्टफोलियो) आणि गुंतवणूक वैविध्य (असेट अलोकेशन)
सोने-चांदीत गुंतवणूक मर्यादित, तर घर-दुकान, जमीन, भूखंडात ती मोठी असावी
जर तुमची गुंतवणूक पुंजी खूप मोठी असेल आणि आर्ट व पेंटिंग्जबद्दल तुम्ही जाणकार असाल, तरच या पर्यायांमध्ये आपला पैसा घालणे शहाणपणाचे ठरेल. या गुंतवणुकीत अतिव सावधगिरी खूपच महत्त्वाची ठरेल. बनावट व फसले जाण्याची शक्यता, त्याचप्रमाणे योग्य त्या किंमत निश्चितीची समस्या असल्याने अत्यंत गुंतागुंतीची समज आवश्यक ठरेल. हीच बाब हिरे, मौल्यवान रत्न यातील गुंतवणुकीलाही लागू पडते. त्याचप्रमाणे सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंमधील गुंतवणूकही मर्यादित स्वरूपात असावी. घर-दुकान, जमीन, भूखंडात गुंतवणुकीची मात्रा ही खूप मोठी असते आणि शिवाय अनेक प्रकारच्या कायदेशीर बाबी, वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क व करदायित्व यात मोठा पैसा व वेळ खर्ची घालावी लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या गुंतवणुकांच्या तरलतेचा मुद्दा होय. अशा मर्यादित समज असलेल्या महागड्या गुंतवणूक पर्यायांचा विचार करायचाच झाला, तर तज्ज्ञांकडून व्यावसायिक सल्ला मिळवणे श्रेयस्कर ठरेल, अन्यथा शेअर्स आणि म्युच्युअल फंडांची विस्तारलेली वर्गवारीच आपल्यासाठी सर्वोत्तम ठरेल.
(लेखक हे निधी व्यवस्थापक (समभाग)
बीएनपी परिबा म्युच्युअल फंड)
बातम्या आणखी आहेत...