आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीर्घावधीसाठी, नियमित गुंतवणुकीचा शिरस्ता हमखास लाभाचाच !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही बाजारतज्ज्ञाला सल्ला विचारला तर तो समभागांमध्ये दीर्घ मुदतीची गुंतवणूक हेच चांगल्या परताव्याचे साधन सांगेल. इतिहासात डोकावून पाहिले तरी या सल्ल्याला खरे ठरवणारे पुरावे सापडतील. चांगला व्यवसाय असणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या भागधारकांसाठी दीर्घावधीत उत्तम संपत्ती निर्माणाचे काम निश्चितच केले आहे. थोडे बारकाईने विश्लेषण केल्यास आपल्याला जुन्या धूसर झालेल्या आठवणीतील काही कानमंत्र जरूर आठवतील. “अशाच भागधारकांसाठी उत्तम संपत्ती निर्माण झाली आहे, ज्यांनी त्या काळात समभागांतील गुंतवणूक कायम राखली.” आखलेल्या डावपेचांची अंमलबजावणी आणि वृद्धीला वाव ध्यानात घेऊन कोणत्याही व्यवसायाला वाढ साध्य करायला काही काळ द्यावाच लागतो. म्युच्युअल फंडांची गुंतवणूकही समभागांमध्येच होत असल्याने दीर्घावधीसाठी गुंतवणूक कायम राखण्याचा हा सल्ला म्युच्युअल फंडांच्या गुंतवणूकदारांनाही मग लागू पडतो. व्यावहारिक अंगाने पाहिल्यास म्युच्युअल फंडांद्वारे वाढीच्या दमदार शक्यता असलेल्या आणि थोड्या लांबच्या अवधीत कैकपटींनी लाभ देणे शक्य असलेले समभाग हेरून गुंतवणूक केली गेलेली असते. परंतु त्या फंडाच्या अधीन युनिटधारकांचा संयम ढळतो आणि बहुप्रसवा वाढीची सुरुवात होण्यापूर्वीच ते आपली गुंतवणूक विकून मोकळे होतात. कोणत्याही जाणतेपणाने व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या फंडातून दीर्घ मुदतीत आकर्षक परतावाच दिला गेला आहे, परंतु अनेक गुंतवणूकदार थोडक्या कालावधीसाठी आपला पैसा फंडात टाकतात, ही संधी गमावून बसतातच, प्रसंगी तोटाही सहन करताना दिसतात.

सुनियोजित गुंतवणूक
परताव्यातील वाढप्रवणतेचे सांगाती बनण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे एसआयपी (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) अर्थात म्युच्युअल फंडात सुनियोजित पद्धतीने पाळावयाचा गुंतवणुकीचा शिरस्ता होय. आर्थिक नियोजनाची घडी व्यवस्थित बसवू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एसआयपी हे शक्तिशाली साधन आहे. एसआयपी ही गुंतवणूकदारांना बाजारात दमादमाने प्रवेश मिळवून देणारी शिडी असून बाजाराच्या वेगवेगळ्या आवर्तनांमध्ये त्यांच्याकडून युनिट्स संपादित केले जात असल्याने आपोआपच अल्पखर्चात व विनासायास गुंतवणुकीत वैविध्य जपले जाते. आपण सर्व जाणतो की, बाजारात चढ-उतार हे नित्याचेच असतात. बाजार जेव्हा घसरण/ सुधाराच्या टप्प्यात असतो तेव्हा केली जाणारी गुंतवणूक हे एकूण गुंतवणूक मूल्यात सरासरी साधणारी असते, तर बाजार जेव्हा पुन्हा वर चढू लागतो तेव्हा चक्रवाढीचा नियम हा लक्षणीय भांडवल वृद्धी साधणारा परिणाम साधतो.
संयम -सातत्य हवेच
गुंतवणुकीसाठी आवश्यक निधीबरोबरच, एसआयपीचा मार्ग अवलंबिणाऱ्या गुंतवणूकदारांकडे दोन दुर्मिळ गुण – ‘संयम’ आणि ‘सातत्य’ असायलाच हवे. एक चांगली सवय म्हणून हे दोन पैलू प्रत्येक गुंतवणूकदाराने आत्मसात केलेच पाहिजेत. ते असतील तर एसआयपी गुंतवणुकीची गोड फळे पूर्णांशाने चाखता येतील. प्रत्यक्षात घडते मात्र वेगळेच.
जेव्हा शेअर बाजारात पडझड सुरू होते, तेव्हा म्युच्युअल फंडाचे गुंतवणूकदार नाहक त्यांची एसआयपीही मोडताना दिसतात. मासे थव्याने तलावात विहरत असताना ते पकडण्यासाठी टाकलेले जाळे काढून टाकणारी ही शहाजोग कृती आहे. संधी चालून आली असताना घेतला जाणारा हा घोडचुकीचा निर्णय असतो. वस्तुत: जेव्हा बाजार घसरणीला लागलेला असतो तेव्हा उलट खालच्या नक्त मालमत्ता मूल्यात (एनएव्ही – म्युच्युअल फंडांच्या युनिट्सचे मूल्य) आपल्याला एसआयपीवर जास्त युनिट्स मिळवण्याची संधी असते. ज्यातून एकूण खरेदी भाव आपोआपच सरासरी पातळीवर येतो. त्याउलट एसआयपी बंद करून दोन गोष्टी गमावल्या जातात. एक म्हणजे आपल्याला अल्प मूल्यात अधिक युनिट्स खरेदी करता येत नाहीत आणि दुसरे म्हणजे युनिट्सच्या जास्त संख्येवर चक्रवाढ गतीने वृद्धी साधण्याचा अवसरही आपण गमावून बसतो.
चक्रवाढ व्याजाची जादू
वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमध्ये एसआयपीद्वारे शक्य परताव्याचे एक विश्लेषण असे सांगते की, विविध १६१ फंड योजनांमध्ये आधीची १० वर्षे कालावधीसाठी केल्या गेलेल्या एसआयपी गुंतवणुकीचा ३० जून २०१५ अखेर सरासरी प्रतिवर्ष परतावा हा १४.७१ टक्के इतका होता, तर ७१ फंडांमधील १५ वर्षे कालावधीसाठी परतावा हा सरासरी वार्षिक १९.३७ टक्के इतका होता. थोडे सोपे करून सांगायचे झाल्यास कुणा गुंतवणूकदाराने ३,००० रुपयांची एसआयपी गुंतवणूक १२० महिने केली असल्यास जूनअखेर त्याला १४.७१ टक्के दराने ८,११,२४२ रुपयांची पुंजी मिळवता आली असती. मात्र हीच गुंतवणूक १५ वर्षे सुरू राहिली असती तर त्याच परतावा दराने ही रक्कम १९,४८,७५४ रुपये असती. होय, तुम्ही बरोबर ताडले, पाच वर्षे कालावधी वाढल्याने परतावा रक्कम दुपटीहून अधिक वाढली आहे. हीच तर चक्रवाढ परताव्याची (Power of Compounding) जादू आहे. परंतु आपण १५ वर्षे गुंतवणुकीचा वास्तविक परतावा दर गृहीत धरला, तर १५ वर्षांसाठी केली जाणारी एसआयपी १९.३७ टक्के दराने प्रत्यक्षात ३१,३२,६२९ रुपयांची पुंजी निर्माण करेल. म्हणजे १० वर्षे एसआयपीच्या परताव्याच्या तुलनेत ३.८६ (जवळपास चार पट) अधिक लाभ होईल. आणि एसआयपी गुंतवणुकीच्या मुद्दलाच्या (५,४०,००० रुपये) तुलनेत परतावा ५.८० पटीने अधिक असेल. परंतु ज्या गुंतवणूकदाराने दुर्दैवाने त्यांच्या एसआयपी गुंतवणुकीला इतका कालावधी दिला नसेल त्यांना मात्र ही लाभ-संधी अनुभवताच आली नसेल.
खालील दिलेला तक्ता अव्वल कामगिरी असलेल्या १० फंडांतून १० वर्षे व १५ वर्षे एसआयपी करून मिळू शकणाऱ्या वार्षिक सरासरी परतावा दराचा तपशील दिला आहे. उपलब्ध माहितीनुसार, जितका कालावधी लांबेल तितका सरासरी परतावा दर उंचावलेलाच दिसून येतो, जसे १० वर्षांच्या तुलनेत १५ वर्षे कालावधीच्या एसआयपीचा परतावा हा प्रत्येक प्रकारात २ ते ३ टक्के अधिकच आहे. अधिकच्या टक्क्यांना चक्रवाढीचे बळ मिळून प्रत्यक्ष परतावा रक्कम पटीत वाढलेली आपण आधी दिलेल्या उदाहरणात पाहिली आहे.
सारांशात, सुरू असलेली एसआयपी बंद करणे, बाजारातील अस्वस्थता पाहून विकणे हे शहाणपणाचे लक्षण कदापिही ठरत नाही. बाजारात वध-घटी सुरूच असतात आणि दीर्घावधीत अर्थव्यवस्था जसजशी विस्तारते तसे बाजाराचीही वाढ सुरू असते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे केव्हाही सुरू कराल, जेव्हा सुरू कराल तो एसआयपी गुंतवणुकीसाठी सुदिन ठरेल... पण ही गुंतवणूक नियमित, सातत्याने, जितके शक्य आहेत तितक्या दीर्घ कालावधीसाठी मात्र असावी.
- रणजित आर. जी.
( लेखक जिओजित बीएनपी परिबाचे राष्ट्रीय वितरणप्रमुख आहेत)
पुढील स्‍लाइडसवर पाहा, संबंधित ग्राफीक्‍स...