Home »Business »Business Special» News About Merger Of Idea And Vodafone

मुंबई- व्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण; देशातील मोठी दूरसंचार कंपनी होणार

दिव्य मराठी नेटवर्क | Mar 21, 2017, 12:15 PM IST

मुंबई -देशातील क्रमांक दोन व तीनच्या दूरसंचार कंपन्या व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर यांनी विलीनीकरणाची घोषणा केली. विलीनीकरणानंतर ग्राहक संख्या व महसूल या दोन्ही दृष्टीने ही देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी होईल. विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण होण्यास दोन वर्षे लागतील. दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर आता रिझर्व्ह बँक, सेबी आणि अन्य मंजुऱ्या मिळणे बाकी आहे. व्होडाफोन इंडिया ब्रिटिश फर्म व्होडाफोनची भारतीय शाखा आहे. आयडिया सेल्युलर बिर्ला समूहाची लिस्टेड कंपनी आहे.

नव्या कंपनीच्या संचालक मंडळात १२ सदस्य असतील. व्होडाफोन आणि व्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण; देशातील मोठी दूरसंचार कंपनी होणार बिर्ला समूहाकडे प्रत्येकी तीन सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार असेल. कुमारमंगलम बिर्ला याचे चेअरमन असतील. बिर्ला यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत व्होडाफोनचे सीईओ व्हिटोरियो कोलाओ म्हणाले, मुख्य वित्त अधिकाऱ्याची नियुक्ती त्यांची कंपनी करेल. सीईओ व सीओओंची नियुक्ती दोन्ही कंपन्या मिळून करतील. व्होडाफोन ग्रुपचा (यूके) सरकारसोबत १४,२०० कोटी रुपयांचा करविषयक वाद सुरू आहे. या वादाचा करारावर परिणाम होणार नाही.
विलीनीकरणामुळे नवे व स्वस्तातील प्लॅन मिळतील
व्होडाफोन - आयडिया, एअरटेल व रिलायन्स जिओमध्ये स्पर्धा आणखी तीव्र होईल. जास्तीत जास्त ग्राहकांना जाळ्यात ओढण्यासाठी कंपन्या नवे व स्वस्तातील प्लॅन आणतील. विलीनीकरणामुळे व्होडाफोन - आयडियाची गुंतवणूक घटेल. चौथ्या वर्षीपासून कंपनीची सुमारे १३,६५० कोटी रुपयांची बचत होईल. याचा फायदा ग्राहकांना मिळू शकतो. मात्र, काही दिवसांनंतर दरवाढ होण्याची शक्यता आहे.
१५० एमबीपीएस पर्यंत स्पीडचा दावा
कोलाओ म्हणाले, कंपनी हायस्पीड डेटावर काम करेल तसेच १५० एमबीपीएसपर्यंत स्पीड उपलब्ध केली जाईल. बिर्ला म्हणाले, गेल्या एका दशकात समूहाने दूरसंचार व्यवसायात १.१५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. नवी कंपनी कंटेंट व मोबाइल पेमेंटसारख्या डिजिटल सेवांमध्ये गुंतवणूक करेल.
चांगल्या नेटवर्कचा लाभ मिळेल
व्होडाफोन - आयडियाकडे संपूर्ण देशातील थ्रीजी स्पेक्ट्रम असतील. फोरजी सेवांसाठी १८०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये सर्वांत जास्त स्पेक्ट्रमही असतील. व्होडाफोन व आयडिया, दोन्ही देशांतील सर्व २२ सर्कलमध्ये आहेत. व्होडाफोनने मार्च २०१७ पर्यंत १७ सर्कलमध्ये व आयडियाने २० सर्कलमध्ये फोरजी सेवा देत असल्याचा दावा केला आहे.
व्होडाफोन-आयडिया : तीन वर्षांपर्यंत त्रयस्थांकडून शेअर खरेदी-विक्री नाही
व्होडाफोन आणि आयडिया यांच्यातील विलीनीकरण मुख्यत्वे शेअरच्या अदलाबदलीतून होणार आहे. आयडिया सेल्युलर नव्या कंपनीच्या ५० टक्के इक्विटीच्या बरोबरीत शेअर व्होडाफोनला जारी करेल. त्यानंतर आयडियाचे संचालक व्होडाफोनकडून ३,८७४ कोटी रुपयांत ४.९ टक्के शेअरची खरेदी करतील. व्होडाफोन इंडिया आणि आयडिया तीन वर्षांपर्यंत कोणत्याही तिसऱ्या पार्टीकडून शेअरची खरेदी किंवा त्यांना विक्री करू शकणार नाहीत. आदित्य बिर्ला समूहाला नवीन कंपनीचे ९.५ टक्के शेअर व्होडाफोनकडून १३० रुपयांच्या दराने खरेदी करण्याचा अधिकार असेल. दोन्ही कंपन्यांची भागीदारी बरोबरीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे व्होडाफोन समूहाचे सीईओ व्हिक्टोरिया कोलाओ आणि बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांनी सांगितले.

या करारानंतर तीन वर्षांपर्यंत भागीदारी बरोबरीत झाली नाही तर बिर्ला समूहाला किती शेअर खरेदी करण्याची इच्छा आहे, त्याची माहिती व्होडाफोनला देईल. त्यानुसार १२ महिन्यांत बाजारभावाप्रमाणे शेअरची खरेदी करावी लागणार अाहे. कराराच्या पाच वर्षांनंतरही नवीन कंपनीमध्ये दोघांची इक्विटी बरोबरीत झाली नाही तर व्होडाफोन पुढील पाच वर्षांत अतिरिक्त शेअरची खुल्या बाजारात विक्री करेल.
आयडियाच्या शेअरमध्ये ९.५ टक्के घसरण
विलीनीकरणाच्या घोषणेनंतर सोमवारी मुंबई शेअर बाजारात आयडियाचे शेअर ९.५५ टक्क्यांच्या घसरणीसह ९७.६० रुपयांवर आले. राष्ट्रीय शेअर बाजारातही यात ९.६२ टक्क्यांची घसरण झाली. कंपनीचा मार्केट कॅप ३,६९२ कोटी रुपयांनी कमी झाला. दिवसभराच्या व्यवहारात शेअर १४.७३ टक्क्यांपर्यंत खाली आले होते.
महसूल, ग्राहक, स्पेक्ट्रम मर्यादेपेक्षा जास्त
स्पेक्ट्रम मर्यादेच्या नियमानुसार नवीन कंपनीला सुमारे एक टक्का स्पेक्ट्रमची विक्री करावी लागेल. यातून ५,४०० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. नियमानुसार कोणत्याही कंपनीकडे एका विभागात वितरित करण्यात आलेल्या स्पेक्ट्रमपैकी २५ टक्के आणि विशिष्ट बँडमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त स्पेक्ट्रम असू शकत नाही. विलीनीकरणानंतरही तयार होणाऱ्या कंपनीकडे ग्राहक आणि महसुली शेअरदेखील ५० टक्क्यांपेक्षा जास्त असायला नको. युरोपियन ब्रोकरेज संस्था सीएलएसएने जानेवारीमध्ये जाहीर केलेल्या अहवालानुसार विलीनीकरणानंतर पाच विभागांत कंपनीचा महसूल, सबस्क्रायबर आणि स्पेक्ट्रम शेअर निश्चित मर्यादेपेक्षा जास्त असतील.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended