गंगापूर (जि.औरंगाबाद) -तालुक्यात तीन वर्षांपासून पडत असलेला सततचा दुष्काळ व नापिकीमुळे अनेक शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून निवडलेल्या दुधाचा व्यवसायदेखील संकटात सापडला आहे. पाण्याच्या बाटलीपेक्षा स्वस्त दरात दूध विक्री करावी लागत असल्याने दुभत्या जनावरांना चाराटंचाईमुळे जगवण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.
दुधाच्या उत्पादनात वाढ व सबसिडी बंद केल्याने भाव घसरले आहेत. गंगापूर शहर व तालुक्यात दुधाची विक्री करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी डेअरीमध्ये आणलेल्या गाईच्या दुधाला १४ रुपयांपासून २० रुपये प्रतिलिटर फॅटप्रमाणे भाव मिळत आहे. त्यातून जनावरांच्या चारापाण्याचा खर्चदेखील निघत नसल्यामुळे ही जनावरे कशी जगवावीत याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
सबसिडी बंद : दुधाच्या खरेदीवर मागील सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या दुधाला वाजवी भाव मिळावा यासाठी दूध खरेदीवर प्रतिलिटर ठरावीक सबसिडी दिली जात होती.
पशुखाद्याचे दरही वाढले
पशुखाद्याचे पोते बाराशे रुपयाला, हिरवा चारा व कडब्याचे गगनाला भिडलेले भाव यामुळे दुधाच्या विक्रीतून खर्च निघत नसल्याने पशुधन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
- सोमनाथ कळसकर, दूध उत्पादक
पाण्याची बाटली २० रूपये
तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय कामांसाठी गंगापूर व बाजाराच्या ठिकाणी गेल्यानंतर तहान भागवण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटलीसाठी २० रुपये मोजावे लागतात. याउलट त्यांनी परिश्रम करून विक्रीसाठी आणलेल्या गाईच्या दुधाला १४ रुपये प्रतिलिटर भाव मिळत आहे.
अनुदान दिल्यास न्याय
वाढलेले दुधाचे उत्पादन, दूध भुकटीचे कमी झालेले दर यामुळे दूध खरेदीचे दर कमी झाले आहेत. यासाठी शासनाने दुधाच्या खरेदीवर भेदभाव न करता सरसकट अनुदान दिल्यास दूध उत्पादकांना योग्य भाव मिळेल.
- डॉ. भगवान सटाले, शांताई मिल्क प्रॉडक्ट
ग्राहकांना ३४ रुपये भावाने विक्री
शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दुधाचे भाव कमी असताना ग्राहकांना मात्र हेच दूध ३० ते ३४ रुपये प्रतिलिटर भावाने खरेदी करावे लागत आहे. यासंदर्भात येथील खासगी डेअरी विक्रेत्याशी चर्चा केली असता गाईच्या दुधाची खरेदी करणाऱ्या प्लँटकडून शिळे, ताजे दूध व फॅटनुसार भाव आम्हाला दिला जात आहे. त्याच भावाने दुधाची खरेदी करावी लागत आहे.