Home »Business »Business Special» News About More Sales Of IPhone

तेजी : आयपॅडमुळे ‘अॅपल’च्या उत्पन्नात सात टक्के वाढ

वृत्तसंस्था | Aug 03, 2017, 03:02 AM IST

  • तेजी : आयपॅडमुळे ‘अॅपल’च्या उत्पन्नात सात टक्के वाढ
क्यूपर्टिनो (कॅलिफोर्निया) -आयफोनच्या जास्त विक्रीमुळे जगातील सर्वात मोठी टेक कंपनी अॅपलच्या विक्रीत एप्रिल ते जून तिमाहीमध्ये सात टक्क्यांची वाढ झाली असून विक्री ४५.४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी या समान तिमाहीमध्ये ४२.४ अब्ज डॉलरची विक्री झाली होती. अॅपलच्या या विक्रीमध्ये आंतरराष्ट्रीय विक्री म्हणजेच अमेरिकेच्या बाहेरील विक्रीचा ६१ टक्के वाटा आहे. या तिमाहीचा निकाल जाहीर करताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टीम कुक यांनी सांगितले की, या तिमाहीमध्ये कंपनीचा निव्वळ नफा ११.७९ टक्क्यांनी वाढून ८.७२ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी हा ७.८० अब्ज डॉलर होता. प्रती शेअरच्या दृष्टीने हे निव्वळ उत्पन्न १.६७ डॉलर राहिले आहे. हा आकडा गेल्या वर्षी समान तिमाहीमध्ये १.४२ डॉलर होता.
अॅपलने एप्रिल-जून तिमाहीमध्ये १.६ टक्क्यांच्या वाढीसह ४.१० कोटी आयफोनची विक्री केली. गेल्या वर्षी या समान तिमाहीमध्ये कंपनीने ४.०४ कोटी आयफोनची विक्री केली होती. आयपॅडच्या विक्रीत १५ टक्के, तर अॅपल वॉचच्या विक्रीत ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे कंपनीचा सेवा क्षेत्रातील व्यवसाय म्हणजेच अॅप स्टोअर, अॅपल पे आणि आय क्लाऊडमध्ये २१.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. हा आकडा ७.२७ अब्ज डॉलर राहिला. अॅपलने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये ४९ ते ५२ अब्ज डॉलर विक्रीचा अंदाज व्यक्त केला आहे.
भारताप्रति खूप ‘बुलिश’ :कुक म्हणाले की, भारताप्रति मी खूप ‘बुलिश’ आहे. आम्ही भारतात गुंतवणूक करत आहोत. आज भारत जेथे आहे तेथे अनेक वर्षांपूर्वी चीन होता. भारतात आयफोनच्या विक्रीत तेजीने वाढ होत आहे.
१० वर्षांत १.२० अब्ज आयफोनची विक्री
अॅपलने २९ जून २००७ रोजी आयफोन लाँच केला होता, अशी माहिती कुक यांनी दिली. कंपनीने दहा वर्षांत आतापर्यंत १.२० अब्ज फोनची विक्री केली आहे. गेल्या वर्षीपर्यंत विक्री १ अब्जापर्यंत पोहोचली होती. या वर्षी कंपनीने आतापर्यंत यात २० कोटी रुपयांची वाढ मिळवली आहे. यात कंपनीने एप्रिल ते जून तिमाहीदरम्यान ४.१० कोटी आयफोनची विक्री केली आहे.
सप्टेंबर महिन्यात आयफोन-८
सप्टेंबर महिन्यात अॅपल कंपनी नवीन मॉडेल आयफोन - ८ सादर करू शकते. यामध्ये हाय-रेझोल्युशन ओएलईडी डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञान दिले जाण्याची अपेक्षा आहे. या फोनची किंमत १००० डॉलर म्हणजेच सुमारे ६४,००० रुपये राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अॅपलचे एआयवर काम सुरू
कुक यांनी सांगितले की, अॅपल ड्रायव्हरलेस कारवरच नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) संबंधित अनेक प्रकल्पांवर काम करत आहे. मात्र त्यांनी सविस्तर माहिती दिली नाही. रोबोट व इतर उत्पादनांवर काम करत असल्याची चर्चा आहे.
मार्केट कॅप ५२ लाख कोटींपेक्षा जास्त
चांगली तिमाही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर अमेरिकी शेअर बाजारात अॅपलच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. कंपनीचे शेअर ६ टक्क्यांच्या तेजीसह १५९.१० डॉलरच्या ऑल टाइम हायवर पोहोचले. कंपनीचा मार्केट कॅप ५२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. हा अाकडा भारताच्या जीडीपीच्या एक तृतीयांशाच्या बरोबरीत आहे.

Next Article

Recommended