आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅलन्स फंड - जोखीम कमी, परतावा उत्तम तरीही दुर्लक्षित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असताना बॅलन्स फंड या पर्यायाचा फारसा विचार केला जात नाही. बॅलन्स फंडामधील गुंतवणूक ही साधारणत: ६५% इक्विटी मार्केटमध्ये आणि ३५% डेट मार्केटमध्ये केली जाते. त्यामुळे असेट अलोकेशन आपोआप होते. त्यासाठी गुंतवणूकदाराला वेगळे काही करण्याची गरज पडत नाही. यामुळे गुंतवणुकीतील जोखीम काही प्रमाणात निश्चितच कमी होते.

दुसरी गोष्ट म्हणजे बॅलन्स फंडामधील गुंतवणूक १२ महिन्यांपेक्षा जर अधिक कालावधीसाठी असेल तर आजच्या प्राप्तिकर कायद्यानुसार या फंडातील गुंतवणुकीतून मिळणारा नफा करमुक्त आहे. मध्यम काळासाठी ते दीर्घकाळासाठी बॅलन्स फंडाने अतिशय उत्तम परतावा दिल्याचे दिसून येते. खाली १५ वर्षांच्या कालावधीपर्यंत विविध कालावधीसाठी दिलेल्या सुनियोजित गुंतवणुकीत (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन - एसआयपी) चार्टमध्ये बॅलन्स फंडांनी किती टक्के परतावा दिला आहे हे दाखवले आहे.
तक्त्यानुसार बहुतांश बॅलन्स फंडांनी एसआयपीत १५% पेक्षाही अधिक रिटर्न दिल्याचे दिसून येते. आता सध्या बॅलन्स फंडाचा उपयोग काही प्रमाणात एसडब्ल्यूपी (सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन) साठी होत असताना दिसतो. यामध्ये बॅलन्स फंडात एकरकमी १० लाख किंवा २० लाख रुपयांची गुंतवणूक करायची आणि १२ महिन्यांनंतर दरमहा ०.७५% ते १% रक्कम काढायची. म्हणजे १० लाख रुपये गुंतवले तर १२ महिन्यांनंतर दरमहा साधारण ७,५०० ते १०,००० रुपये काढायचे आणि जर फंडाचा परतावा हा १३% ते १५ % च्या आसपास असेल तर दरमहा ७,५०० ते १०,००० रक्कम काढली तरी मूळ मुद्दलात वाढ होत राहते. थोडक्यात, रिटायरमेंट फंडासारखा याचा उपयोग केला जातो. यात फायदा हा आहे की १२ महिन्यांनंतर काढलेली रक्कम ही करमुक्त असते आणि बँक एफडीपेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते.

परंतु यामधील धोका हा आहे की म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे.त्यामुळे मूळ मुद्दल कमी होण्याचा किवा संपण्याचा धोकादेखील असू शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच ती करावी. अर्थात, वरील वाक्य मान्य करूनही मागील काही वर्षांत मिळणारे परतावे लक्षात घेता आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक न करणे किंवा त्या गुंतवणुकीपासून दूर राहणे हे जास्त जोखमीचे ठरू शकते हे म्हणणेही अगदी शंभर टक्के खरे आहे.
- गुंतवणूकतज्ज्ञ 9960641613