आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा नावाचा मित्र : सकारात्मक दृष्टिकोन हवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परीक्षांचा काळ आता सुरू होत आहे. प्रारंभी जरी दहावी-बारावीच्या परीक्षा असल्या तरी त्या विद्यार्थ्यांसह करिअर घडवणाऱ्या या परीक्षांची तयारी, मानसिकता कशी असावी हे सांगणारे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही उपयोगी ठरणारे, गांभीर्याने घ्यावे असे सोप्या शब्दांतील मार्गदर्शन .....  
 
पालकांचीच परीक्षा :   शालेय दहावी व बारावी परीक्षांचा वातावरण घरात मुलांवर अनेक निर्बंध घालून वर्षभर अगोदरपासूनच तयार होते. मात्र, ते सर्व करताना महत्त्वाचे हे असते की विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व पालकांना आपल्या कर्तव्यासाठी सुदृढ शरीर प्रकृतीची व चांगल्या मन:स्थितीची गरज असते. शरीराबरोबर मनाचे आरोग्य महत्त्वाचे आहे. सामाजिक वातावरण, एकाग्रता, उत्तम शारीरिक स्वास्थ्य असणे गरजेचे आहे.  

परीक्षा काळातील आहारविहार : परीक्षा जवळ येताच विद्यार्थी आहाराकडे लक्ष न देता अभ्यास करत राहतात. त्यामुळे शरीरास पोषक तत्त्वे न मिळाल्याने विविध शारीरिक कमजोरीची लक्षणे समोर येतात. तेव्हा आई-वडिलांनी मुलांना पोषक घटक मिळत आहेत ना याकडे लक्ष द्यावे. शक्यतो घरचेच ताजे, सात्त्विक अन्न द्या. तळलेले पदार्थ, आंबट पदार्थ, पिझ्झा, बर्गर आदी खाणे टाळावे.  

वेळेचे नियोजन :  दोन-अडीच महिने आधी आठवड्यास एक विषय असे नियोजन करावे. त्यानंतर दिवसांचे व नंतर तासांचे नियोजन करावे लागते, तर ताणरहित परीक्षा देता येईल. अभ्यासाचे विषय ओळीने लिहून सोपा व सहज आकलन होणारा विषय कमी कालावधीत पूर्ण करून यादीतील त्या विषयावर काट मारा. त्यानंतर दुसरा सोपा आवडीचा विषय पूर्ण करा. जसजशी विषयांची संख्या कमी होईल तसतसे मनावरचे ओझे कमी होईल. 

परीक्षा काळातील व्याधी :   या काळात  झोप न लागणे, भूक न लागणे, थंडी-ताप, जुलाब, नैराश्य, घबराट, मनाची चंचलता, छातीत धडधडणे, ऐनवेळी होणारे विस्मरण, थकवा, लेखनाची गती कमी होऊन वेळ न पुरणे आदी लक्षणे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाच्या कमीमुळे जाणवतात. या व्याधींसाठी औषधोपचारांची गरज नाही तर शारीरिक, मानसिक ताणतणाव दूर केल्यास वरील लक्षणांतून मुक्ती मिळू शकते. यासाठी थोडा वेळ काढून शरीराला शिथिलीकरणाची सवय लावून घेतल्यास खूप फायदा होतो. रक्ताभिसरण चांगले होते. शारीरिक अवयवांची क्षमता व आत्मविश्वास वाढतो. भरपूर ऑक्सिजन मिळाल्याने स्मरण चांगले होते. मन शांत राहते. प्रफुल्लित, चैतन्यमय राहते.  

शिथिलीकरणाअगोदर शरीराला ताण द्या. दोरीवरच्या उड्या मारा, श्वासोच्छ्वास नियंत्रित करत पाठीवर ताठ झोपून पायाच्या बोटापासून एक-एक अवयव शिथिल करत जा, जसे पायाचे बोट, तळवा, घोटा, पोटरी, गुडघा शिथिल होत आहे. मग मांडी, कंबर, पाठ, खांदे शिथिल होतात. त्यानंतर हाताची बोटे, तळवा, मनगट, कोपरा, हात खांद्याचा सांधा शिथिल होतो. मानेचे मणके, कवटी, कवटीतील डावा मेंदू, उजवा मेंदू, छोटा मेंदू शिथिल होत जातो. आता मेंदूला आदेश द्या. माझा मेंदू खूप तल्लख आहे. मी जे वाचले, समजले ते मेंदूत व्यवस्थित जतन करून ठेवत आहे. मी खूप हुशार आहे.   

स्मरणशक्ती वाढण्यासाठी चांगली झोप येणे गरजेचे आहे. कुठलाही अभ्यास केल्यावर कष्टाची कामे, मैदानी खेळ, टीव्ही कार्यक्रम पाहण्यापेक्षा छोटीशी झोप घ्या, तर वाचलेले दीर्घकाळ लक्षात ठेवणे सोपे जाते. अगदीच कंटाळा आल्यास हलकाफुलका कार्यक्रम, सूर्यनमस्कार यासारखा व्यायाम, चेस, बॅडमिंटन, टेनिससारखे खेळ खेळलात तर मन प्रसन्न होऊन अभ्यासात मन लागेल.   

झोप येत नसेल, जळजळ असेल तर त्या वेळी तोंडात पाणी भरून डोळे उघडे ठेवून हलके पाणी मारा. घाबरेपणा, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कमी वेळात भरपूर विश्रांतीसाठी आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्राणायाम करा. आत्मविश्वास प्रबळ असेल तर यश तुमच्यापासून दूर नाहीच.  
पालक व पाल्य संबंध : या वयात विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी असतात. शेवाळावर उभ्या या नवपिढीने तोल ढळू न देता अभ्यासात मन गुंतवणे व यश संपादन करणे मोठे जिकिरीचे काम आहे. मन जर अभ्यासात एकाग्र होत नसेल तर त्या मागच्या कारणांची मनमोकळी चर्चा करणे आवश्यक आहे. पालक त्यातून मार्ग काढू शकतील. पालकांनीही मुलांना समजावून घेतले पाहिजे, आपली मुले कोणकोणत्या ताणतणावांना सामोरे जातात हे जाणून सकारात्मकपणे त्याला आधार द्या. तू नक्कीच चांगला पेपर देशील, ताण न देता पेपर दिल्यास नक्की चांगले मार्क्स मिळतील, तुला जे मार्क मिळतील त्यात आम्ही समाधानी राहू. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, मनाला शांतता मिळवून देणारा एखादा फोटो जवळ ठेवता येईल. परीक्षेला जाण्यापूर्वी :   परीक्षेला जाण्यापूर्वी हलकाफुलका नाष्टा करा. परीक्षा केंद्रावर फार नको, अर्धा तास आधी पोहोचा. २-३ पेन, पॅड व पाणी बाटली, रुमाल, हॉलतिकीट, आयकार्ड, पेन्सिल, रबर, स्केल आदी गोष्टी न विसरता घ्या. परीक्षेपूर्वी चेहऱ्यावर पाणी मारून फ्रेश व्हा, आपला अभ्यास पूर्ण झालाय त्यामुळे आत्मविश्वास ढळू देऊ नका. परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर तरीही घबराट, छातीत धडधड, घाम येणे होत असल्यास ताबडतोब दीर्घश्वसन करा. आपल्या मनाला दिलासा  उभारी आणायची.  

- परीक्षेदरम्यान : -  प्रश्नपत्रिका पाहतानाच आधी कोणता प्रश्न सोडवायचा ते ठरवून टाका. सोपा प्रश्न सर्वप्रथम सोडवा.     
 
सकारात्मक दृष्टिकोन हवा 
स्मरणशक्तीच्या बळावरच उत्तरे समजून पाठ करून लिहिल्यास गुण चांगले मिळतात. त्यामुळे गाइड-पुस्तकातील उत्तराची भाषा पाठ करून जशीच्या तशी लिहू नका. स्वत:च्या भाषेत समजलेले प्रभावीपणे लिहा, अधिक गुण मिळतीलच. पालकांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आपला पाल्य कुवतीनुसार कठोर परिश्रम घेतोय ना ते पाहावे. टक्केवारीची अपेक्षा धरू नका. त्यामुळे त्याचे मन विचलित होऊन ताण वाढू शकतो. परीक्षा काळात सकारात्मक वातावरण पालकांनी ठेवावे. अनावश्यक गप्पा टाळा, वाद, पार्ट्या टाळा.  

प्रा. डॉ. ज्योती ज. शिंदे, औरंगाबाद. 
(लेखिका या मानसशास्त्र व मराठी शिकवतात) 
बातम्या आणखी आहेत...