आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवक घटूनही कांद्याचे दर 800 रुपयांनी कोसळले; ठेवलेला उन्हाळी कांदा धोका देण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्रातील व्यापारीदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे पीक असणाऱ्या कांद्याचे दर महिनाभरात तब्बल ८०० रुपयांनी कोसळल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. मालाची आवक घटली असतानाही १६७५ रुपये क्विंंटलवर गेलेले कांद्याचे दर ९०० रुपयांवर कोसळल्याने शेतकऱ्यांना धक्काच बसला आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांचा पूरग्रस्त राज्यातून येणाऱ्या मागणीकडे डोळा लागला असून तेथील पीक नष्ट झाल्याने कांद्याला चांगला भाव मिळेल, असा त्यांचा अंदाज आहे. नवीन कांदा येईपर्यंत किमान दीड-दोन महिने कांद्याचे दर चढेच राहतील, असे व्यापारी सांगतात.  

कांदा पिकवणाऱ्या राज्यांत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. राज्यात सुमारे १ लाख हेक्टरवर  कांद्याची लागवड केली जाते. नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि सातारा कांदा पिकवण्यात अग्रक्रमावर आहे.  मराठवाड्यातही काही भागांत तुरळक प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. नाशिकचा कांदा शहरात येतो. कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रातील ३७ टक्के तर भारतातील १० टक्के कांद्याचे उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात घेतले जाते.  

गेल्या सहा महिन्यांपासून घाऊक बाजारात सात ते दहा रुपये किलोवर स्थिरावलेला कांदा ऑगस्टच्या मध्यात दहा ते पंधरा रुपये किलोवर पोहोचला होता. नवीन कांदा येण्यास दीड ते दोन महिने बाकी आहेत. यामुळे चांगला दर मिळण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी जपून ठेवलेला उन्हाळी कांदा बाहेर येत आहे. १ अॉगस्टला अवघा ३४० क्विंटल कांदा बाजारात आला होता. या वेळी सर्वसाधारण दर ९५० रुपये क्विंटल होता.  १४ ऑगस्टला ४४५ क्विंटल कांदा बाजारात आला. 

पुरवठा वाढला असतानाही दर १६७५ वर पोहोचले होते. यामुळे पुढील काळातही दर चढेच राहतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्याही आशा वाढल्या होत्या.मात्र, याच्या पुढील दिवसांत कांद्यात घसरण सुरू झाली ती आजही कायम आहे. ३० ऑगस्टला ११०० रुपये तर ९ ऑगस्टला ९०० रुपये दराने कांदा विकला गेला. महिनाभरात कांद्याचे दर तब्बल ८०० ते ९०० रुपयांनी घसरल्यामुळे व्यापाऱ्यांत चिंता वर्तवली जात आहे. जपून ठेवलेला उन्हाळी कांदाही धोका देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

दोन महिन्यांत दरात वाढ होण्याची शक्यता
व्यापारी सोमनाथ वाकळे  म्हणाले, काही राज्यांत आलेल्या पुरामुळे तेथील कांद्याचे पीक नष्ट झाले  आहे. साठवलेला कांदाही पाण्यात गेला आहे. यामुळे  तेथून मागणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेथे चढे दर मिळण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी जमा करून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दर कोसळल्याचे ते म्हणाले. असे असले तरी औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजारपेठेत कांद्याची आवक वाढण्याऐवजी कमी होत असल्याचे चित्र आहे. पूरग्रस्त राज्यांतील मागणी आणि नवीन कांदा येण्यासाठी असणाऱ्या अवकाशामुळे पुढील दीड ते दोन महिने कांद्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वाकळे यांनी वर्तवली आहे.  
बातम्या आणखी आहेत...