आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पादनात ९% घट झाल्याने साखर महागण्याची शक्यता, दर जास्त असल्याने साखर कारखान्यांचा नफा वाढणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उत्पादनात ९ टक्क्यांपर्यंत घट झाल्यामुळे पुढील काही दिवस साखर महागच राहण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामातील अतिरिक्त साठादेखील कमी असून मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गुणांकन संस्था इक्राने जाहीर केलेल्या एका अहवालात असा अंदाज व्यक्त केला अाहे. सरकारने या वेळी उसाचे योग्य समर्थन मूल्य (एफआरपी) वाढवलेले नसल्याचे मतही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. असे असले तरी सध्या साखरेचे दर जास्त असल्याने साखर कारखान्यांचा नफा वाढणार असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. 
 
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील साखर उत्पादनात घट झाली असल्याचे मत इक्राच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या जास्त उत्पादनामुळे काही प्रमाणात त्याची भरपाई झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या एकूण उत्पादनात ९ टक्के कपात झाली आहे,  तर दुसरीकडे साखरेच्या मागणीमध्ये दरवर्षी २ ते ३ टक्के वाढ नोंदवण्यात येत आहे. यामुळे पूर्ण वर्षभरातील साखर उत्पादनाचा विचार केल्यास २५ ते २८ लाख टन साखरेची कमी राहण्याची शक्यता इक्राने व्यक्त केली  आहे. 

जागतिक पातळीवरदेखील साखरेची कमतरता भासत आहे.  यामुळेच ऑक्टोबरपासूनच भारतीय बाजारात साखरेचे दर वाढलेले  आहेत. मात्र, उत्पादनात घट नोंदवण्यात आल्यामुळे अलीकडच्या काळात  साखरेचे दर कमी होण्याची अपेक्षा नाही.

अमेरिकेत निर्यातीला मंजुरी 
सरकारच्या वतीने ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत अमेरिकेत ८,४२४ टन कच्ची साखर निर्यात करण्याला मंजुरी दिली आहे. ही निर्यात टेरिफ रेट कोटाअंतर्गत होईल. या व्यवस्थेमध्ये निश्चित करण्यात आलेल्या निर्यातीवर कमी दर लागतो.  त्यानंतर दरात वाढ होते. द्विपक्षीय कराराअंतर्गत सध्या वर्षभरात अमेरिकेत १०,००० टन साखर निर्यात करण्यासाठी तेथे कोणतेच शुल्क अाकारण्यात येत नाही. अशीच व्यवस्था युरोपियन युनियनसोबतही करण्यात आलेली आहे. ब्राझीलनंतर भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि सर्वात जास्त मागणी असलेला देश आहे. वर्ष २०१४ - १५ (ऑक्टोबर - सप्टेंबर) मध्ये ११ लाख टन साखरेची निर्यात झाली आहे.

गेल्या वर्षीचा ७६ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा शिल्लक
साखरेचे हंगामी वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबरदरम्यान असते. ऑक्टोबर २०१६ मध्ये गेल्या वर्षीचा ७६ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा शिल्लक आहे. त्यामुळे चालू हंगामाचा विचार केल्यास पूर्ण वर्षभरात साखरेची उपलब्धता ३०५ ते ३१० लाख टन राहण्याची शक्यता आहे. यंदा देशात २६० लाख टन साखरेची मागणी राहण्याची शक्यता आहे. याप्रमाणे हंगामाच्या शेवटी ४८ लाख टनांच्या जवळपास क्लोजिंग स्टॉक राहण्याची शक्यता आहे. सामान्यपणे देशात ६४ लाख टन साखर शिल्लक राहते.  
बातम्या आणखी आहेत...