आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या आयकॉनची जबाबदारी घेण्यास चंद्रशेखरन सक्षम: महिंद्रा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी एन. चंद्रशेखरन यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे उद्योग जगताने स्वागत केले आहे. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तुम्ही भारताचे आयकॉन (टाटा समूह) चे कस्टोडियन आहात. ही जबाबदारी पेलण्यास तुमचे खांदे पूर्णपणे सक्षम आहेत, असेही महिंद्रा म्हणाले. अनिल अंबानी म्हणाले की, “व्हॅल्यू क्रिएशन तसेच लिडरशिपमध्ये त्यांची बरोबरी होऊ शकत नाही.त्यांच्यासोबत मी अनेक स्पर्धांत पळालो आहे. त्यांच्या धैर्याचा, दृढतेचा तसेच उद्दिष्टाप्रति असलेल्या निश्चयाचा मी सन्मान करतो. लोक म्हणतात तसेच ते एक स्वत:च पूर्ण पॅकेज आहेत.’   
 
ही एक सर्वोत्तम निवड असून हा त्यांचा हक्कच असल्याचे मत एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी व्यक्त केले आहे. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो, त्यांच्यात खूपच ऊर्जा असल्याचेही ते म्हणाले. चंद्रा नेहमीच लोकांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतात, असे मत इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हाने असणार आहेत. मात्र, या आव्हानांचा सामना करण्याची क्षमता त्यांच्या असल्याचे त्यांनी टीसीएसमध्ये दाखवले आहे, असेही ते म्हणाले.   

आयसीआयसीआय बँकेच्या एमडी चंदा कोचर यांनी सांगितले की, “चंद्रा यांनी टीसीएसला जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान कंपनी बनवले आहे. सरकारी तसेच औद्योगिक संघटनांच्या बैठकीमध्ये आमची अनेकदा चर्चा झाली आहे. प्रत्येक वेळी मी त्यांना विचारी व्यक्ती म्हणूनच पाहिले आहे.’  भारतीय बिझनेस जगतातील “कोहिनूर’चे त्यांच्यापेक्षा अधिक चांगले नेतृत्व कोणीच करू शकत नसल्याचे मत आरपीजी एंटरप्राइजेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी व्यक्त केले आहे. ते टाटा समूहाचा आणखी विकास करतील. कोटक महिंद्रा बँकेचे उपाध्यक्ष उदय कोटक म्हणाले की, मी वैयक्तिक पातळीवर त्यांचा सन्मान करतो, त्यांना माझ्याकडून शुभेच्छा.

२९ वर्षे टीसीएसमध्ये  : त्रिची येथील विभागीय अभियांत्रिकी महाविद्यालयात एमसीएची पदवी मिळवल्यानंतर चंद्रशेखरन यांनी १९८७ ला टीसीएसमध्ये काम करण्यास सुरुवात केली.  त्यांना २००९ मध्ये कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली. ते २०१२ - १३ मध्ये आयटी उद्योग संघटना नॅस्कॉमचे अध्यक्ष होते. सरकारच्या वतीने बनवण्यात आलेल्या अनेक समित्यांचेही ते सदस्य आहेत. ५४ वर्षीय चंद्रा मुंबईमध्ये पत्नी ललिता तसेच मुलगा प्रणवसोबत राहतात.
 
राजेश गोपीनाथ टीसीएसचे सीईओ  
चंद्रशेखरन यांच्यानंतर टीसीएसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच व्यवस्थापकीय संचालकांची जबाबदारी राजेश गोपीनाथ यांच्याकडे देण्यात आली आहे. ते फेब्रुवारी २०१३ पासून कंपनीमध्ये मुख्य लेखाधिकारी आहेत. त्यांनी २००१ ला टीसीएसमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. चंद्रशेखरन यांच्याप्रमाणेच गोपीनाथ यांनीदेखील त्रिची अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून व्यवस्थापनशास्त्राची पदवी घेतली होती.
 
फोटोग्राफीची अावड  
चंद्रशेखरन स्वत: एक उत्तम फोटोग्राफर आहेत. तसेच त्यांना लांब पल्ल्याच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची आवड आहे. आतापर्यंत त्यांनी अॅमस्टरडॅम, बोस्टन, शिकागो, बर्लिन, मुंबई, न्यूयॉर्क, पॅराग्वे, स्टॉकहोम, सँडबर्ग तसेच टोकियो मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे.   
 
निवड झाल्यानंतर चंद्रशेखरन यांची प्रतिक्रिया
टाटा समूह बदलाच्या उंबरठ्यावर 
‘टाटा समूह बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे. खूप मोठी जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. टाटा समूहाला त्यांची प्रकृती, नैतिकता आणि तत्त्वांसोबत पुढे नेण्याचा माझा प्रयत्न असेल. या महान संस्थेची जबाबदारी माझ्यावर दिल्याबद्दल मी स्वत:ला कृतज्ञ मानतो. टाटा सन्सचे संचालक मंडळ व रतन टाटा यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ३० वर्षांपेक्षा जास्त काळापासून मी टाटा समूहाशी जोडलेलाअसल्याचा अभिमान आहे.’
 
चंद्रा यांच्यासमोरील आव्हाने  
१. टाटा सन्स संचालक मंडळातील भांडणात अडकले आहे. माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्सच्या विरोधात लवादाकडे याचिका दाखल केली आहे. यात त्यांना पदावरून काढण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. टाटा सन्सने मिस्त्री यांना काढण्यासाठी ६ जानेवारी रोजी ईजीएम बोलावली आहे.  
२. टाटा स्टील युरोप त्यांच्यासमोरील दुसरे मोठे आव्हान आहे. युरोपातील उद्योग तोट्यात सुरू आहे. त्यामुळे याची भागीदारी विक्री करण्यावरही संचालक मंडळात चर्चा सुरू आहे.  
३. जपानची दूरसंचार कंपनी डोकोमोसोबत असलेला वाद हीदेखील एक मोठी समस्या आहे. या प्रकरणात टाटा समूहाला आधीच लवादाकडे सुमारे ८,००० कोटी रुपयांच्या दाव्याबाबत पराभव स्वीकारावा लागला आहे.   
 
चंद्रा समूहाला नव्या उंचीवर नेतील : टाटा  
मुंबई - एन. चंद्रशेखरन यांच्यावर अवघड कामाची जबाबदारी टाकण्यात अाली असून ते टाटा समूहाला नव्या उंचीवर नेतील असा विश्वास टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी शुक्रवारी व्यक्त केला. टाटा समूहाच्या तत्त्वांची ते रक्षा करतील असेही रतन टाटा म्हणाले. चंद्रशेखरन यांच्यात खूप क्षमता असून त्यांनी आपले नेतृत्व  सिद्ध केले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो असेही रतन टाटा यांनी ट्विट केले आहे. त्यांच्यातील नेतृत्व क्षमतेचा हा सन्मान असल्याचेही ते म्हणाले.