आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्च महिन्यात 15% निधी खर्च करा ; अर्थ मंत्रालयाचे निर्देश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात विविध मंत्रालये आणि विभागांना खर्च कमी करावा लागणार आहेे. मार्च महिन्यात केवळ १५ टक्के रक्कम खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता केवळ तीन आठवडे शिल्लक आहेत. पीएफएमएस - ‘पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टिम’अंतर्गत नसलेल्या विभाग तसेच मंत्रालयांना दैनंदिन महसुलाची माहिती देण्याचे सांगण्यात अाले आहे. या निर्देशानुसार सर्व नियमित मंजुऱ्या तसेच बिलांची माहिती पीएफएमएसवर २० मार्चपर्यंत अपडेट करावी लागणार आहे. पीएफएमएस - सेंट्रल प्लॅन स्कीम मॉनिटरिंग सिस्टिम (सीपीएसएमएस) या नावानेही ओळखली जाते. या माध्यमातून खर्चावर लक्ष ठेवण्यात येते. निधीचा प्रवाह सुनिश्चित
करण्यासाठीही या प्रणालीचा वापर करण्यात येतो.  
 
जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंतच्या एकूण खर्चाची मर्यादा ३३ टक्के आणि मार्च महिन्यासाठी १५ टक्के करण्यात आली असल्याचे एका कार्यालयीन निर्देशपत्रात नमूद करण्यात आले आहे. ही व्यवस्था तुटणार नाही याचीही काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे. अर्थ मंत्रालयातील खर्च विभाग वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पतील तरतुदीच्या तुलनेत वास्तविक उत्पन्न आणि खर्च यांच्यातील आकडेवारीवर लक्ष ठेवणार आहे. हा विभाग एक मार्चपासून ते ३१ मार्चपर्यंतची दैनंदिन आकडेवारी पुरवणार आहे.  

खर्च विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या निर्देशानुसार जे मंत्रालय/विभाग/ केंद्रशासित प्रदेश आतापर्यंत पीएफएमएसवर नाहीत, त्यांना आपले उत्पन्न आणि खर्चाची माहिती दररोज द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर या विभागाने सीबीडीटी आणि सीबीईसी यांनादेखील दररोजची आकडेवारी  वेळेवर अपडेट करण्याचे सांगितले आहे. 
 
उद्दिष्टापेक्षाही जास्त राजकोशीय तूट 
 चालू आर्थिक वर्षात राजकोशीय तूट म्हणजेच सरकारचा खर्च आणि जमा झालेला महसूल यातील अंतर जानेवारीपर्यंत वाढून ५.६४ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. पूर्ण वर्षभरासाठी निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हा आकडा १०५.७ टक्क्यांच्या बरोबरीत आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षात ५.३३ लाख कोटी रुपयांचे राजकोशीय तुटीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. जीडीपीच्या तुलनेत हा आकडा ३.५ टक्क्यांच्या बरोबरीत आहे.
बातम्या आणखी आहेत...