आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘निरमा' विकत घेणार 9,400 कोटी रुपयांची सिमेंट कंपनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निरमा कंपनी १.४ अब्ज डॉलरमध्ये (९, ४०० कोटी) सिमेंट कंपनी लाफार्ज इंडियाला खरेदी करणार आहे. “लाफार्ज इंडिया’ जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी असून लाफार्ज-होलसिमची भारतीय शाखा आहे. या व्यवहारासाठी आता प्रतिस्पर्धा नियामक आयोगाकडून (सीसीआय) मंजुरी घेतली जाणार आहे. लाफार्ज इंडिया खरेदीसाठी अजय पिरामल यांच्या पिरामल एंटरप्रायजेस आणि सज्जन जिंदाल यांच्या जेएसडब्ल्यू सिमेंट कंपनीनेही बोली लावली होती. विदेशी कंपन्या आणि खासगी इक्विटी फंडनेही ही कंपनी खरेदी करण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु निरमाची बोली जास्त ठरली.

लाफार्ज इंडियाचे तीन प्लँट आणि दोन ग्राइंडिंग स्टेशन आहेत. त्यांची वार्षिक क्षमता १.१ कोटी टन आहे. ही कंपनी रेडीमिक्स काँक्रीटही बनवते. निरमाची उपशाखा सिद्धिविनायक सिमेंट्सचा राजस्थानमध्ये २० लाख टन क्षमतेचा प्लँट आहे. लाफार्ज इंडियाला खरेदी केल्यानंतर याची क्षमता १.३५ कोटी टन होईल. ही कंपनी गुजरातमधील महुवामध्ये नवीन प्लँट उभारण्याच्या तयारीत आहे. लाफार्ज-होलसिमने प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले की, कंपनीची उपशाखा एसीसी लिमिटेड आणि अंबुजा सिमेंटच्या माध्यमातून व्यवसाय सुरू ठेवेल. एसीसी, अंबुजा सिमेंटची एकूण क्षमता वार्षिक सहा कोटी टन आहे. लाफार्ज-होलिसिम ९० देशांत व्यवसाय करते. जगभरात याचे १.१५ लाख कर्मचारी आहेत. कंपनीची वार्षिक उलाढाल दोन लाख कोटी आहे.
एकाधिकारामुळे ‘लाफार्ज इंडिया’ची विक्री : लाफार्ज फ्रान्सची आणि होलसिम स्वित्झर्लंडची कंपनी होती. दोघांनी २०१४ मध्ये एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यानंतर लाफार्ज-होलसिम जगातील सर्वात मोठी कंपनी बनली. एकाधिकाराचा धोका लक्षात घेऊन अनेक देशातील नियामकांनी कंपनीला काही प्लँट विकण्यास सांगितले. भारतात सीसीआयने ५१.१ लाख टनाच्या प्लँटला विकण्याचे निर्देश दिले. एप्रिल २०१५ मध्ये या कंपनीने जाजोबेरा आणि सोनाडीहच्या शाखा पाच हजार कोटींमध्ये विकण्यासाठी एमपी बिर्ला समूहासोबत करार केला. पण खाणींचे हस्तांतरण थांबल्याने हा करार रद्द झाला. त्या वेळी लाफार्ज-होलसिमने पूर्ण लाफार्ज-इंडियाला विकण्याचा निर्णय घेतला. नियामकांच्या मंजुरीसाठी दक्षिण कोरियातील प्लँट विकावे लागले. सौदी अरेबियासह काही देशांत अशीच चर्चा सुरू आहे.
करसनभाई डिटर्जंट सायकलवर विकायचे
निरमा ही अहमदाबादची कंपनी आहे. याची उलाढाल जवळपास ७, ३०० कोटी आहे. ही कंपनी शेअर बाजारात लिस्टेड नाही. रसायनशास्त्रातील पदवीधर असलेले करसनभाई पटेल या कंपनीचे अध्यक्ष आहेत. नोकरी करत ते १९६९ मध्ये घरात डिटर्जंट बनवून सायकलवर विकत होते. त्या वेळी हिंदुस्तान लिव्हरचे डिटर्जंट १३ रुपये किलाने विकले जात होते. करसनभाई यांनी त्यांचे डिटर्जंट तीन रुपये किलोने विकून याचे नाव निरमा ठेवले. भारत आणि अमेरिकेत यांचे १२ मॅन्युफॅक्चरिंग प्लँट आहेत. कंपनीत १८ हजारांच्या जवळपास कर्मचारी आहेत.
सिमेंट क्षेत्रातील मोठा करार
लाफार्ज इंडियाचा करार या वर्षातील सिमेंट क्षेत्रातील दुसरा मोठा करार आहे. आठवडाभरापूर्वी जेपी असोसिएट्सने १६ हजार ५०० कोटींच्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीची शाखा विकण्याची घोषणा केली होती. याची क्षमता १.७२ कोटी टन आहे.
बातम्या आणखी आहेत...