नवी दिल्ली- दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांमुळे चर्चेत असलेल्या विदर्भात अमूल समूहातर्फे ४०० कोटींचा डेअरी प्रकल्प उभारला जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
"कर्जाच्या जाळ्यातून शेतकऱ्यांची मुक्ती' या विषयावर आयोजित एका कार्यशाळेत ते बोलत होते. नुकताच त्यांनी गुजरात दौरा केला. त्या वेळी त्यांनी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन आणि अमूल कंपनीशी चर्चा केली. अमूल विदर्भातील सद्य:स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने अमूल समूहाकडे काही योजना आणण्याचा आग्रह धरला होता. याच पार्श्वभूमीवर अमूलने ४०० कोटींच्या प्रकल्पासाठी इच्छा दर्शवली असल्याचे गडकरी म्हणाले. ते पुढे म्हणाले, अमूलने नुकताच खानदेशातील जळगावमध्ये डेअरी प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाअंतर्गंत अमूल लोकांकडून दूध खरेदी करेल आणि नंतर त्यावर प्रक्रिया केली जाईल. दरांच्या बाबतीत अमूल सध्या आघाडीवर आहे. पुढील वर्षांत रोज ३८ दशलक्ष लिटरपेक्षा अधिक दुधावर प्रक्रिया करून उत्पादने तयार करण्याच्या उद्देशाने अमूल अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. दूध डेअरीच्या या प्रकल्पाव्यतिरिक्त मधमाशी पालन, शेळीपालनसारखे काही प्रकल्प मोठ्या स्तरावर राबवण्याचा निर्धार असल्याचेही गडकरी यांनी या वेळी सांगितले.
राज्यातील २८ प्रकल्प पंतप्रधान सिंचन योजनेत
सिंचनाखाली दोन कोटी हेक्टर जमीन आणण्यासाठी सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून ८० हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणुकीची योजना तयार केली असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी िदली. शेतकऱ्यांच्या दुर्दशेसाठी ११ राज्यांमध्ये सुरू असलेले वाद जबाबदार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सिंचनावर तेजीने काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त देशातील ८९ प्रकल्पांना पंतप्रधान सिंचन योजनेच्या माध्यमातून २०,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील २८ प्रकल्पांचा समावेश करण्यात आला असल्याचे गडकरी यांनी संागितले.