आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्चपर्यंत एनपीए 10.5 %; दोन वर्षांत कर्ज राइट-ऑफ केल्याने नवा एनपीए कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बँकांनी आतापर्यंत केवळ दोनतृतीयांश अडकलेल्या कर्जाला अनुत्पादीत (एनपीए) श्रेणीमध्ये टाकले आहे. उर्वरित एक तृतीयांश कर्जाचा विचार केल्यास मार्च २०१८ पर्यंत एनपीएची पातळी १०.५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. मार्च २०१७ मध्ये ग्राॅस एनपीए  बँकेच्या एकूण कर्जाच्या ९.५ टक्के होता. गुणांकन संस्था क्रिसिलने गुरुवारी जारी  केलेल्या एका अहवालात असा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या दोन वर्षांत कर्जाची जास्त वसुली होऊ शकली नसल्याचे मत या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. कर्ज राइट - ऑफ केल्याने नवीन एनपीए कमी झाले आहेत. 
 
 
या अहवालानुसार ११.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज अडकलेले आहे. बँकांच्या एकूण कर्जाचा विचार केल्यास हा आकडा १४ टक्के आहे. यात एनपीएसह ज्या कर्जाची रिस्ट्रक्चरिंग झाली आहे त्या कर्जाचाही समावेश होतो. ज्यांचे कर्ज एका बँकेने एनपीए घोषित केले आहे आणि दुसऱ्या बँकेने केलेले नाही अशांचाही यात समावेश करण्यात आला आहे. सर्वात जास्त एनपीए इन्फ्रास्ट्रक्चर, वीज, अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रातील आहे. दिवाळखोरी कायद्यांतर्गत लवकर मार्ग निघाल्याने आता बँकांच्या अॅसेट क्वालिटीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. 
 

बँकिंग क्षेत्रात नकारात्मकता
 बँकिंग क्षेत्रातील आउटलूक नकारात्मक राहणार असल्याची शक्यता गुणांकन संस्था फिचने व्यक्त केली आहे. बँकांसमोर निधीची मोठी समस्या असल्याचे फिचने म्हटले आहे. नवी कर्जात जास्त तेजी येण्याची अपेक्षा नसल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम होईल. बँकांची अॅसेट क्वालिटीदेखील चांगली नाही. बेसल-थ्री मानांकनाचे नियम पूर्ण करण्यासाठी मार्च २०१९ पर्यंत बँकांना ४.१ लाख कोटी रुपयांची गरज आहे. यातील ९० टक्के रक्कम सरकारी बँकांना हवी आहे.
 
कर्जात जास्त वाढ नाही  
कमोडिटीच्या किमतीत होत असलेली सुधारणा, व्याजदरातील कपात, चांगल्या पायाभूत सुविधा आणि कंपन्यांची कार्यक्षमतेत सुधारणा होत असल्याने भविष्यात अडकलेल्या कर्जाच्या आकड्यात जास्त वाढ होण्याची शक्यता नसल्याचे मत क्रिसिलच्या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.  
 
एसएमई क्षेत्रातील एनपीएत वाढ  
नोटाबंदी, जीएसटी आणि कर्जमाफीमुळे छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या वतीने कर्जाची परतफेड करण्यात अडचणी येतील. त्यामुळे या क्षेत्रातील बँकांची अॅसेट क्वालिटी खराब होण्याची अपेक्षा आहे.  
बातम्या आणखी आहेत...