आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवक वाढल्याने कांद्याच्या दरात दीडशे रुपयांची घसरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देशातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव अाणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीत दाेन दिवसांपासून कांद्याची अावक वाढल्याने दरात प्रतिक्विंटलमागे दीडशे रुपयांची घसरण झाली अाहे. त्यामुळे अाता दर ९०० रुपये झाला अाहे. या घसरणीने बळीराजा काहीसा निराश झाला असला तरी ग्राहक मात्र सुखावला अाहे. दरम्यान, बिहार आणि पश्चिम बंगालचा कांदा बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाल्याने सध्याचे दर स्थिर हाेण्याची शक्यता आहे.

दोन आठवड्यांपूर्वी अनेक राज्यांमधून नवीन कांद्याची आवक होत हाेती. त्यामुळे मुबलक प्रमाणात कांदा उपलब्ध झाला. परिणामत: दरात घसरण झाली. सध्या गुजरात आणि राजस्थानचा कांदा संपण्याच्या मार्गावर अाहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा दरवाढीची प्रतीक्षा होती. मागील आठवड्यात लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा कमी असल्याचे कारण दाखवत लिलाव तीन दिवस बंद करण्यात अाला हाेता. त्यामुळे आवक घसरली होती. पिंपळगाव बाजार समितीत कांदा दरात दीडशे ते दोनशे रुपयांनी वाढ होऊनदेखील प्रतिक्विंटल सव्वाअकराशे रुपयांपर्यंत ताे पोहोचला होता. त्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला हाेता. परंतु पुन्हा कांदा लिलाव पूर्ववत सुरू झाला आणि कांदा आवक वाढली. त्यामुळे दरात घसरण झाली आहे. यंदा महाराष्ट्रामध्ये कांद्याचे अधिक उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करून ठेवली आहे. तसेच सध्या व्यापारी वर्गही कांद्याची साठवणूक करून ठेवीत आहे. त्यामुळे या दोन्ही वर्गांना कांदा दरात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

नियमनमुक्तीवर पुढील अाठवड्यात निर्णय : महाराष्ट्रात सध्या बाजार समितीमधून कांदा, बटाटा आणि भाजीपाला नियमनमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आडतीपासून दिलासा मिळणार आहे. परंतु आडतदारांना हा निर्णय मान्य नसल्याने त्यांनी याला विरोध केला आहे. पुढील आठवड्यात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. बाजार समित्या नियमनमुक्त झाल्यास व्यापारी आणि आडतदार हे राज्यात कांदा लिलाव बंदची घोषणा करण्याची शक्यता असल्याने पुन्हा कांद्याची टंचाई भासून दरात वाढ होऊ शकते.

महाराष्ट्र मागे का?
महाराष्ट्रातील कांदा जगात प्रसिद्ध असूनही दर घसरणीच्या काळात राज्य सरकारकडून केवळ कांदा खरेदीच्या घोषणा केल्या जात आहेत. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कांद्याला दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे गेल्या महिन्यात स्पष्ट केले हाेते. त्यासाठी नियोजन सुरू असल्याचे सांगितले हाेते. मात्र, या नियोजनाबाबत अजून कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे पुढे आलेले नाही. दुसरीकडे मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी पाच रुपये किलोप्रमाणे कांदा खरेदीला सुरुवात केली आहे.
बातम्या आणखी आहेत...