नवी दिल्ली - पंतप्रधान नेरंद्र मोदी मंगळवारी उद्योजकांसोबत बैठक घेणार आहे. यामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सध्याच्या घटनाक्रमांवर आणि त्यामुळे भारताला मिळणाऱ्या संधी यावर चर्चा होणार आहे. नुकतीच चीनमध्ये आलेल्या आर्थिक मंदीमुळे जगभरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिका व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता असल्याने अनेक विकसनशील देश चिंतेत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री, रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यासह ४० उद्योगांचे प्रमुख, बँकर्स आणि अर्थतज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. अनेक मंत्र्यांसह रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया, मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियम, अर्थ मंत्रालयाचे सचिवदेखील उपस्थित राहतील. तिन्ही उद्योग संघटना सीआयआय, असोचेम, फिक्कीच्या प्रमुखांनादेखील बोलावण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक व्यक्तीला बोलण्यासाठी तीन मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. उद्योजकांसोबत मोदींची ही दुसरी बैठक आहे. या आधी ३० जूनला ते उद्योजक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटले होते. त्या वेळी महाग कर्ज, बिझनेसचा रस्ता सोपा करणे आणि कर नीतींमधील अस्थिरता यावर चर्चा झाली होती.
सचिवांची चर्चा
अर्थ मंत्रालयाच्या सचिवांनी अार्थिक संकटाच्या दृष्टीने सोमवारी देशाच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा केली. यामध्ये प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा झाली. रतन पी. वाटल अर्थ सचिव झाल्यानंतर ही सचिवांची पहिलीच बैठक होती. पुढील काळात अशी बैठक दर आठवड्याला होणार आहे. मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियमदेखील बैठकीला उपस्थित होते. अर्थ सचिवांनी पुढील अर्थसंकल्पाच्या मुद्द्यांवरदेखील या वेळी चर्चा केली.