नवी दिल्ली- करदात्यांची संख्या दुपटीने वाढवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असून त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.
"महसूल ज्ञान संगम' या परिषदेत ते बोलत होते. मात्र, करदात्यांची संख्या वाढवताना अायकर अधिकाऱ्यांची वागणूक योग्य असली पाहिजे, प्रत्येक व्यक्ती हा कर चोर असल्याचे समजण्याची गरज असल्याचा सल्लादेखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. आयकर अधिकाऱ्यांना मोदी यांनी कर व्यवस्थापनाचा "रॅपिड'मंत्र देत महसूल, जबाबदारी, प्रॉबिटी, माहिती आणि डिजिटायझेशन हे महत्त्वाचे पाच खांब असल्याचे मोदी यांनी सांगितले. या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कर व्यवस्थापनाला प्रभावी आणि चांगले करण्यावर जोर देण्याची आवश्यकता असल्याचे मत मोदी यांनी व्यक्त केले. सध्या भारतात ५.४३ कोटी करदाते आहेत, त्यांची संख्या दुपटीने वाढवून १० कोटी करण्याचे आवश्यक असल्याचे मत मोदी यांनी व्यक्त केले.
आयकर अधिकाऱ्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली.
पहिल्यांदाच आयोजन
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) आणि उत्पादन शुल्क आणि सीमा सेंट्रल बोर्ड (सीबीईसी) यांची एकत्रित बैठक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या माध्यमातून सरकारी अधिकारी तसेच कर प्रणाली यांच्यात सामंजस्य साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या बैठकीत सर्वसामान्य व्यक्तीच्या भाषेत करासंबंधित भाषा आणि नियमांची स्वतंत्र यादी तयार करण्याची सूचना एका अधिकाऱ्याने केली. करदात्यांशी अधिकाऱ्यांचा व्यवहार योग्य आणि सौम्य असला पाहिजे, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
कर वाचवण्याचे गुगलवर १२ कोटी पर्याय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, कर कसा भरावा यासंबंधी गुगलवर सर्च केल्यास सात कोटी उत्तरे मिळतील. मात्र, तेच कर कसा वाचवता येईल, या विषयी सर्च केल्यास त्याचे मात्र १२ कोटी पर्याय उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. आयकर विभागात ४२,००० अधिकारी आहेत. मात्र, त्यांच्या माध्यमातून केवळ टक्के कर जमा होत असल्याचे मोदी यांनी सांगितले. महसूल विभागाच्या या संगमाला "कर्म संगम'मध्ये बदलले असल्याचे मत महसूल सचिव हसमुख अढीया यांनी व्यक्त केले. या परिषदेत सुमारे २५० अधिकारी तसेच या दोन्ही बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत.