आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर बाजारात हमी भावापेक्षा कमी दराने मुगाची खरेदी; दुसरीकडे सर्रास कमी भावाने खरेदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुगाची पेरणी करण्यात येते. मात्र, सध्या बाजारात मुगाला हमी भावापेक्षा कमी दर मिळताना दिसत आहे. जिल्ह्यात ज्या प्रमाणे तूर हमी भाव व खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली, त्याप्रमाणे मुगासाठीही होणे गरजेचे होते, परंतु शासनाचा ५ हजार ५७५ रुपये प्रतिक्विंटलचा हमी भाव ठरलेला असला तरी प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी दराने मूग खरेदी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.  

मागील वर्षी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ९७ क्विंटल मुगाची आवक झाली होती, परंतु आता काढणीचा हंगाम सुरु असला तरी बाजार समितीच्या बाजारभाव विभागात एक किलो देखील मूग विक्रीसाठी आलेला नाही किंवा खरेदी करण्यात आल्याची नोंद नाही. या  उलट बाजार समितीत दिवसाकाठी किमान सात ते १० क्विंटल मूग विक्रीसाठी येत आहे. यंदा मुगासाठी ५ हजार ५७५ रुपये हमी भाव देण्यात आला आहे. यापेक्षा कमी भावाने मूग खरेदी करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची तरतूदही आहे, परंतु सरकारी नियम वेशीवर टांगत सर्रासपणे अवघ्या ३ हजार ते ३२०० ते ३५०० या दराने मूग खरेदी होत आहे. अशा तक्रारीही “दिव्य मराठी’कडे आलेल्या आहेत.  

लागवड क्षेत्रात यंदा ३६ टक्के वाढ  
मुगाच्या घसरत्या किमतीला लगाम घालण्यासाठी किमान आधारभूत किमतीने (एमएसपी) मूग खरेदी करण्याचे आदेश केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेले आहेत. मागील वर्षी नाफेडद्वारे १८ केंद्रांची उभारणी करून खरेदी केली होती. यातही अडचणी आल्यास भारतीय अन्न महामंडळातर्फे (एफसीआय) खरेदी करण्याचे नियोजन होते. देशातील विशेषत: महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये मुगाची आवक बऱ्यापैकी असते. मागील हंगामासाठी मुगाला बोनस मिळून ५२७५ रुपये प्रतिक्विंटल हमी भाव देण्यात आला होता.  

- मागील वर्षीचा हमी भाव - ५२७५ रुपये   
- सध्याच्या वर्षाचा हमी भाव - ५५७५ रुपये   
- मागील वर्षी ऑगस्टमधील आवक - १० क्विंटल    
- ऑगस्टमध्ये गेलेला दर - किमान ४८५० - सर्वसाधारण ५०५१ व कमाल ५३०० रुपये   
- मागील वर्षी सप्टेंबरमधील आवक  - ८६ क्विंटल - ४३५० - ५०५१ - ५४०० रुपये   
- आवक एकूण सन २०१६ - १७ ची - ९७ क्विंटल   
- मागील वर्षी मूग खरेदीसाठी नाफेडद्वारे - १८ केंद्रे  

 
हमी भाव देण्यासाठी निवेदन देऊ  
सरकारने  कृषी मालाला ठराविक हमी भाव नियमित केला आहे. तुरीसाठी शेतकरी संघटनेने अावाज उठवलेला होता. आता मुगासाठीही तसे निवेदन देऊ, परंतु यंदा आपल्याकडे इतका मूग नसल्याने व अजून तशा तक्रारीही आमच्याकडे प्राप्त झाल्या नसल्याने आम्ही शांत होतो.
- महमूद पटेल, शेतकरी संघटना

मुगाची ३,२०० ने विक्री  
माझा साडेसहा क्विंटल मूग निघाला होता. तो मी रास करुन, काड्या व कचरा काढून बाजार समितीत आणला, परंतु आडत्याने तो ३ हजार २०० रुपये क्विंटल रुपयांनी खरेदी केला आहे. याची कोणत्याच प्रकारची पावती दिली नाही. जी पावती दिली, ती साध्या कागदावर पेनाने लिहिलेली आहे. हमी भाव एक असताना कमी दराने खरेदी करण्यात आली आहे. 
- एक शेतकरी
बातम्या आणखी आहेत...