आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'महागाईसोबतच व्याजदरातही घट' हे कसे शक्य होईल : राजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महागाई कमी करण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न योग्य असल्याचा दावा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केला आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून आपण महागाईच्या विरोधात लढा देत असल्याचे मत राजन यांनी व्यक्त केले आहे. गव्हर्नर म्हणून कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा अध्यापन क्षेत्रात परत जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर ते पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात बोलत होते. विकासाला चालना देताना महागाईकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या दोन्हीवर सोबत उपाय योजना करता येणार नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राजन यांचा कार्यकाळ चार सप्टेंबरला पूर्ण होणार आहे. त्यानंतर पुन्हा दुसरा कार्यकाळ घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. पुढील काळातही महागाईवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला राजन यांनी नव्या गव्हर्नरला दिला आहे.

नवीन गव्हर्नरची नियुक्ती करताना ज्या व्यक्तीला रिझर्व्ह बँक आणि कामाचे फ्रेमवर्क माहिती अाहे, अशाच व्यक्तीची निवड करण्यात येईल, असा विश्वास वाटत असल्याचे मतही राजन यांनी व्यक्त केले. विकासाकडे जाताना आपण महागाईकडे दुर्लक्ष करू शकत नसल्याचे मतही राजन यांनी मांडले. मुंबईमध्ये "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च' मध्ये आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. रिझर्व्ह बँकेने धोरण निश्चिती करताना केलेल्या व्याजदर कपातीनुसार बँकांनी व्याजदर कपात केलेली नसल्याचेही ते म्हणाले. भारताने महागाई कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य केल्यास आपल्या अर्थव्यवस्थेत स्थिरता येईल, असेही राजन यांनी सांगितले.

या नावांची चर्चा : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राजन यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या पदावर गव्हर्नर ़म्हणून सध्या एसबीआय बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, आरबीआयचे डिप्टी गव्हर्नर ऊर्जित पटेल, अर्थसचिव शक्तिकांत दास, मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम, विजय केळकर, आरबीआयचे माजी डिप्टी गव्हर्नर राकेश मोहन, अशोक लाहिरी, आरबीआयचे माजी डिप्टी गव्हर्नर सुबीर गोकर्ण, अशोक चावला यांच्या नावांची चर्चा सुुरू आहे.

विश्वास वाढला
आपल्या धोरणावर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला असून आपण महागाईच्या विरोधातील आपले उद्दिष्ट साध्य केल्यास यात आणखी वाढ होणार असल्याचे मत रघुराम राजन यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची त्यांनी प्रशंसा केली. किरकोळ महागाई दराचे उद्दिष्ट तसेच स्वतंत्र धोरण समिती बनवण्याचा सरकारचा निर्णय महत्त्वाचा असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

गव्हर्नर निवडीसाठी समिती नाही
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या नावाची घोषणा योग्य वेळी करण्यात येणार असून, त्यांच्या निवडीसाठी कोणत्याच प्रकारची समिती बनवण्यात येणार नसल्याची माहिती सरकारी सूत्रांनी िदली आहे. राजन यांचा कार्यकाळ चार सप्टेंबरला संपणार आहे. त्यांच्या नंतर नवीन गव्हर्नरची नियुक्ती करण्यासाठी सरकाच्या वतीने सध्या कोणतीच समिती गठित करण्यात येणार नसल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी िदली आहे. अापल्या विरोधात होत असलेल्या राजकीय हल्ल्यादरम्यान राजन यांनी पुन्हा गव्हर्नरपद स्वीकारणार नसल्याची घोषणा शनिवारीच केली होती. आपण पुन्हा अध्यापनच्या क्षेत्रात परत जाणार असल्याचे राजन यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळ पुन्हा वाढवण्याबाबत होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. राजन यांच्याविषयी सर्व स्पष्ट झाल्यानंतर भारतीय शेअर बाजाराचा सोमवारी पहिलाच दिवस होता. या दरम्यान सुरुवातीला रुपयात घसरण नोंदवण्यात आली होती. मात्र, दुपारी खरेदी दिसून आली.
बातम्या आणखी आहेत...