मुंबई/नवी दिल्ली- दुसऱ्या कार्यकाळाबाबतची चर्चा सातत्याने होत असलेले राजकीय हल्ले यामुळे व्यथित रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शनिवारी अचानक दुसरा कार्यकाळ स्वीकारण्यास नकार देत अध्यापन क्षेत्रात परतण्याची घोषणा केली. हे देशाचे मोठे नुकसान असल्याची टीका उद्योग जगत विरोधी पक्षाने केली. गरज भासल्यास
आपल्या देशाच्या सेवेसाठी मी सदैव उपलब्ध राहीन, असे राजन यांनी म्हटले आहे.
योग्य विचार सरकारशी विचारविमर्श केल्यानंतर सप्टेंबर २०१६ रोजी गव्हर्नरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर मी शैक्षणिक क्षेत्रात परत जाणार आहे, हे मी आपल्याला कळवू इच्छितो, असे त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. राजन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीबाबत खूप आधीच भविष्यवाणी केली होती. मागच्या संपुआ सरकारने सप्टेंबर २०१३ मध्ये त्यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती केली होती.
राजन यांना गव्हर्नरपदाचा दुसरा कार्यकाळ मिळणार की नाही, याबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगली होती. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राजन यांच्या धोरणांवर सातत्याने हल्ले चढवले होते. व्याजदराबाबतच्या राजन यांच्या सक्तीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले, अशी टीका स्वामी यांनी केली होती. राजन यांच्याकडे अमेरिकी ग्रीन कार्ड असल्यामुळे त्यांची वैचारिक बैठक पूर्णत: भारतीय नसल्याचा आरोपही स्वामींनी केला होता. स्वामी यांच्याकडून राजन यांच्यावर जाहिरपणे टिकास्त्र सोडले जात असतानाच केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सार्वजनिक टीका करता संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. तर राज्यसभेवर नुकतेच नामनिर्देशित झालेल्या खासदारांची टिप्पणी त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले होते. राजन यांनी सप्टेंबरमध्ये कार्यकाळ समाप्तीनंतर आरबीआय सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी प्रचंड व्यथित आहे. मात्र त्यांच्या या निर्णयाने आपल्याला अजिबात आश्चर्य वाटले नाही, असे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. चिदंबरम यांच्या काळातच राजन यांची नियुक्ती झाली होती.