आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेपो दर ०.२५% कपात, कर्ज स्वस्त होणार; गृहकर्ज, सणाच्या खरेदीला ऊर्जितावस्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.२५ टक्के कपात केली आहे. सहा सदस्यीय पतधोरण समितीने मंगळवारी आपले पहिले धोरण जाहीर केले. त्यात रेपो दर ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्के केला. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी आपल्या कारकीर्दीतील पहिल्याच पतधोरणात ग्राहकांना दिलासा दिला अाहे. सहा महिन्यांनंतर झालेल्या रेपो दरातील कपातीमुळे गृह, वाहन व इतर कर्ज स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सणाच्या खरेदीला ऊर्जितावस्था येणार आहे.

स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमच सहा सदस्यांच्या समितीने रिझर्व्ह बँकेचे पतधोरण ठरवले. महागाईचे कारण देत माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मागील सहामाहीत एकदाही रेपो दरात कपात केली नव्हती. त्यामुळे राजन यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर सरकारने रिझर्व्ह बँकेचे पतधोरण ठरवण्यासाठी सहा सदस्यांची समिती नियुक्त केली होती. यात तीन सदस्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त आहेत. या समितीने सारासार विचार करून रेपो दरात पाव टक्का कपातीचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेच्या रेपो दर कपातीचे सरकार, उद्योग जगत, बँकींग क्षेत्र, वाहन उद्योगाने स्वागत केले आहे.

पतधोरणाची वैशिष्ट्ये
- रेपो दरात (बँका ज्या दराने रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात तो व्याजदर)०.२५ टक्के कपात. दर ६.२५ टक्क्यांवर.
- बँकेने रिव्हर्स रेपो द ५.७५ टक्के, कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) ४ टक्के असे जैसे थे ठेवले आहेत.
- चालू आर्थिक वर्षात ७.६% विकास दराचा अंदाज
- मोसमी पावसाने सरासरी गाठल्याने विकासाला चालना मिळण्याचा अंदाज.
- मार्च २०१७ पर्यंत महागाई दर ५% राहण्याचा अंदाज
- सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे किमतीवर दबावाचा अंदाज.
बातम्या आणखी आहेत...