आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याजदरात बदल होण्याची शक्यता कमीच : तज्ज्ञ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा समितीची (एमपीसी) पहिलीच समीक्षा बैठक मंगळवारी (४ ऑक्टोबर) होणार असून यामध्ये व्याजदरात कोणताच बदल होण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्य असलेली समिती नुकतीच नियुक्त करण्यात आली आहे. या समितीला महागाईसंदर्भातील आकडेवारी कमी होण्याची प्रतीक्षा असेल. एमपीसीच्या सर्व सद‌स्यांसह गव्हर्नर म्हणून ऊर्जित पटेल यांचीही पहिलीच बैठक आहे.

रिझर्व्ह बँक व्याजदरात बदल करेल असे सध्यातरी वाटत नसल्याचे मत बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक आर. पी. मराठे यांनी व्यक्त केले आहे. किरकोळ आणि घाऊक दोन्ही महागाई दरावर दबाव दिसत आहेे. ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दर पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर ५.०५ टक्क्यांवर आला आहे. मात्र ठोक महागाई दर वाढून ३.७४ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दोन वर्षांतील सर्वाधिक महागाई दर असून याआधीच्या दोन महिन्यांतही महागाई दरात सलग वाढ नोंदवण्यात आली असल्याचे मराठे म्हणाले.

ऑगस्टमध्ये रिझर्व्ह बँकेसोबत सरकारने केलेल्या करारानुसार महागाई दर पुढील पाच वर्षांपर्यंत चार टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये दोन टक्क्यांची घट किंवा वाढ स्वीकार्ह आहे, तर दुसरीकडे रिझर्व्ह बँकेत काम करताना ऊर्जित पटेल यांनीच सर्वाधिक महागाई दरावर जोर दिलेला आहे. सर्व परिस्थितीत महागाई दर नियंत्रणात ठेवण्यासाठी पटेल व्याजदरात बदल करतील अशी शक्यता नाही.

व्याजदरात कपातीची अपेक्षा : इंडिया रेटिंग
किरकोळ महागाई दरात तेजीने घसरण होत असल्यामुळे व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा असल्याचे मत गुणांकन संस्था इंडिया रेटिंगने व्यक्त केले आहे. मार्च २०१७ पर्यंत महागाई दर पाच टक्क्यांवर ठेवण्याचे उद्दिष्ट रिझर्व्ह बँकेसमोर आहे. सध्याचा किरकोळ महागाई दर पाहता सध्या तरी कोणताच अंदाज व्यक्त करणे घाईचे ठरेल. विशेषकरून खाद्यपदार्थांच्या महागाईबाबत अद्याप ठोस सांगणे अवघड आहे.

बाजाराला व्याजदरात कपातीची आशा
मंगळवारी होणाऱ्या पतधोरण आढावा बैठकीत भारतीय शेअर बाजाराला व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा वाटत आहे. त्यामुळे सोमवारी झालेल्या व्यवहारात १.४७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. सेन्सेक्स ३७७ अंकांच्या वाढीसह २८२४३ च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी १२७ अंकांच्या वाढीसह ८७३८ च्या पातळीवर बंद झाला. व्याजदराचा परिणाम होणाऱ्या स्टॉक्सची सर्वाधिक खरेदी झाली.
बातम्या आणखी आहेत...