आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेपो कपात : नव्या वर्षात रिझर्व्ह बँकेकडून ०.७५% व्याजदर कपात शक्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बुधवारपासून सुरू झालेल्या नव्या आर्थिक वर्षात उद्योगांसह सर्वसामान्यांसाठी चांगले दिवस येण्याची अपेक्षा आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेली स्वस्त कर्जाची मागणी या वर्षात पूर्ण होईल, असा अंदाज बँकर तसेच अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, सध्याचे आर्थिक संकेत पाहता वर्षभरात रिझर्व्ह बँकेकडून ०.५० टक्के ते ०.७५ टक्क्यांनी व्याजदर कपात होण्याची शक्यता आहे. याचा लाभ सामान्यांपासून ते उद्योग जगतापर्यंत सर्वांना होईल.
का होणार कर्ज स्वस्त?

क्रिसिलचे अर्थशास्त्री डी. के. जोशी यांच्या मते अर्थचक्र अजूनही मंदावलेले आहे. त्यामुळे बँकांची क्रेडिट ग्रोथ खालच्या पातळीवर आहे. अशा स्थितीत अर्थचक्राला गती देण्यासाठी रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करू शकते. जोशी यांच्या मते, सध्या महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या अनुरूप आहे. ते पाहता रिझर्व्ह बँक पूर्ण ‌वर्षात ०.५० टक्क्यांपर्यंत प्रमुख व्याजदरात कपात करू शकते. तसेच येत्या ७ एप्रिल रोजी होणाऱ्या पतधोरण आढाव्यात व्याजदरात पाव टक्का कपात शक्य आहे.

उद्योगचक्र मंदावल्याचा दबाव

उद्योग क्षेत्र खासकरून कोअर सेक्टरची चाल मंदावल्याने बँकांवर कर्ज स्वस्त करण्याचा दबाव वाढला आहे. देशातील ८ प्रमुख पायाभूत उद्योगांच्या (कोअर सेक्टर) दरात घसरण आली आहे. जानेवारीत या क्षेत्राची वाढ १.८ टक्के होती, फेब्रुवारीत ती घटून १.४ टक्क्यांवर आली आहे.

कर्जाला मागणी नाही

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार २० फेब्रुवारी २०१५ पर्यंत बँकांद्वारे देण्यात आलेले एकूण कर्ज ६०,३२७ अब्ज रुपये राहिले. मागील वर्षाच्या (२०१४) तुलनेत यात केवळ ९.३ टक्के वाढ झाली आहे. पंजाब व सिंध बँकेचे माजी सीजीएम जी. एस. बिंद्रा यांच्या मते बँकांकडे रोकड पडून आहे. मात्र, कर्जाची मागणी नाही. जास्त व्याजदरामुळे ही मागणी थंडावली आहे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातही मरगळ आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे. बिंद्रांच्या मते, महागाई आणि अर्थव्यवस्था लक्षात घेता व्याजदर पूर्ण वर्षात ०.७५ टक्के कमी होण्याची शक्यता आहे.