आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेटीएममधून रिलायन्सला 2650% नफा, मूल्याकंन पोहोचले 33500 कोटींवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अनिल अंबानी समूहाची कंपनी रिलायन्स कॅपिटलने पेटीएममधील गुंतवणुकीतून मोठा नफा कमवला आहे. या कंपनीने २०१० मध्ये पेटीएमची मूळ कंपनी वन-९७ कम्युनिकेशन्समधील सुमारे एक टक्का भागीदारी फक्त १० कोटी रुपयांत खरेदी केली होती. हे समभाग रिलायन्सने चीनमधील ई-कॉमर्स कंपनी अलिबाबा अाणि त्यांची सहयोगी कंपनी अँट फायनान्शियलला २७५ कोटी रुपयांत विकले आहेत. म्हणजे फक्त सात वर्षांत रिलायन्स कॅपिटलला २६५० टक्के नफा झाला आहे. या व्यवहारानंतर पेटीएमचे मूल्यांकन सुमारे ३३,५०० कोटी रुपये करण्यात आले आहे. पेटीएममध्ये अलिबाबा अाणि अँट फायनान्शियलची आधीच सुमारे ४० टक्के भागीदारी आहे. त्यांनी ई-कॉमर्स संस्था स्नॅपडीलमध्येही इक्विटी घेतलेली आहे.  
या कराराबाबत दोन्ही कंपन्यांच्या वतीने प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला आहे. अनिल अंबानी समूहाची आर्थिक सेवा देणारी कंपनी रिलायन्स कॅपिटलने काही दिवसांपूर्वीच नॉन-कोर संपत्ती विक्री करणार असल्याचे जाहीर केले होते. वन ९७ कम्युनिकेशन्स आयपीओ आणणार असल्याची चर्चा सुरू असतानाच या कंपनीने यामध्ये गुंतवणूक केली होती. 
 
ई-कॉमर्समध्येही आरकॅपची इक्विटी
वन-९७ कम्युनिकेशन्सची संस्था ‘पेटीएम ई-कॉमर्स’मध्ये रिलायन्स कॅपिटलची भागीदारी कायम आहे. सहकंपनीत गुंतवणूक केल्यामुळे ‘पेटीएम ई-कॉमर्स’ कंपनीत मोफत भागीदारी मिळाली होती. अलिबाबा सिंगापूर ई-कॉमर्स आणि सहयोगी संस्था सॅफदेखील ‘पेटीएम ई-कॉमर्स’मध्ये सुमारे १,३५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे ‘पेटीएम ई-कॉमर्स’चे ६,७०० कोटी रुपये मूल्यांकन ठरवण्यात आले आहे. वन-९७ कम्युनिकेशन्सच्या तीन उपकंपन्या आहेत.  
 
शर्मांनी ३२५ कोटींत विकल १ % शेअर  
पेटीएमचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी मूळ कंपनी वन - ९७ कम्युनिकेशन्समधील एक टक्का भागीदारी ३२५ कोटी रुपयांत विक्री केली होती. हा पैसा लवकरच सुरू होणाऱ्या पेमेंट बँकेत गुंतवण्यात आला असल्याची चर्चा आहे. रिझर्व्ह बँकेने पेमेंट बँकेला मंजूरी दिलेली आहे.
बातम्या आणखी आहेत...