आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ 15 मिनिटांसाठी रिलायन्स बनली देशातील सर्वात मोठी कंपनी, दुपारनंतर टीसीएस पुढे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काही वेळासाठी रिलायन्स उद्योग समूह देशातील सर्वात मोठी कंपनी बनला होता. टाटा समूहाची कंपनी असलेल्या टीसीएसपेक्षाही रिलायन्स कंपनीचा मार्केट कॅप जास्त झाला होता. मात्र, दुपारी टीसीएसच्या शेअरमध्ये सुधारणा झाल्यामुळे टीसीएसने पुन्हा रिलायन्सला मागे टाकले. एकेकाळी सलग दोन वर्षी देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून रिलायन्सला ओळखले जात होते. मात्र, सुमारे चार वर्षांपूर्वी रिलायन्सला मागे टाकत टीसीएस देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.  
 
भारतीय शेअर बाजारात मंगळवारी सकाळी व्यवहार सुरू होण्याच्या साधारण एका तासानंतर सकाळी १०.१५ वाजता रिलायन्सचा मार्केट कॅप ४.५८ लाख कोटी रुपये झाला होता. त्या वेळी टीसीएसचे मूल्य ४.५६ लाख कोटी रुपये होते. रिलायन्सच्या शेअरमध्ये सुमारे एक टक्का तर टीसीएसच्या शेअरमध्ये ०.७७ टक्क्यांची तेजी होती. मात्र, दीड वाजेपर्यंत टीसीएसने सर्वात मोठ्या कंपनीचा दर्जा पुन्हा मिळवला. दिवसभराच्या व्यवहारानंतर बाजार बंद झाला त्या वेळी टीसीएसचा मार्केट कॅप ४.५४ लाख कोटी आणि रिलायन्सचा ४.४५ लाख कोटी रुपये होता. या वर्षी रिलायन्सच्या शेअरचे भाव २९% वाढले. यामागचे कारण जिअो मोबाइल असल्याचे मानले जाते. दुसरीकडे टीसीएसमध्ये २%घसरण नोंदवण्यात आली. अमेरिकेने व्हिसा नियम कडक केल्यामुळे टीसीएसवर दबाव वाढला.

५५ लाख कोटी रुपयांची होईल अॅपल
जगातील सर्वात मोठी कंपनी अॅपल या वर्षी आणखी मोठी कंपनी होणार आहे. या वर्षी या कंपनीचा मार्केट कॅप ८२५ अब्ज डॉलर म्हणजेच ५५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सोमवारी या कंपनीचा मार्केट कॅप ७४० अब्ज डॉलर (४९.३ लाख कोटी रुपये) होता. सोमवारी या कंपनीचा शेअर १४१.१२ डॉलरवर बंद झाला होता. वर्षभरात कंपनीचे शेअर १५७ डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

मार्केट कॅपनुसार देशातील मोठ्या कंपन्या  (मार्केट कॅप कोटी रुपयांमध्‍ये)
1) टीसीएस ४,५४,९०३
2) रिलायन्स इंड. ४,४५,५७९
3) एचडीएफसी बँक ३,७०,४८०
4) आयटीसी ३,३८,८५१
5) एसबीआय २,३५,३०७
बातम्या आणखी आहेत...