आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीने रिटेल उद्याेगाला रोज सव्वातीनशे काेटींचा फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाचशे व एक हजार रुपयांच्या नाेटा चलनातून बाद करून काळ्या पैशाच्या विराेधातील लढ्याचे व्यापाऱ्यांनी स्वागत केले अाहे. ग्राहकांनी गरजेपुरतीच खरेदी करण्याचे धाेरण स्वीकारल्यामुळे सध्या माॅल, शाेरूम्समध्ये शुकशुकाट अाहे. लग्नसराई, नाताळ अाणि विवाह समारंभासारख्या महत्त्वाच्या दिवसांतच निर्माण झालेल्या या चलनकल्लाेळामुळे गेल्या दहा-बारा दिवसांत रिटेल उद्याेगाला रोज सव्वातीनशे काेटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले असल्याचे फेडरेशन अाॅफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असाेसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी सांगितले.
दिवाळी संपल्यानंतर लग्नसराई, नाताळ, नवीन वर्षाच्या निमित्ताने नोव्हेंबर ते जानेवारी हा हंगाम दुकानदारांसाठी सुगीचा हंगाम असताे. परंतु सुट्या पैशांच्या चणचणीमुळे प्रत्येकालाच अडचणी निर्माण झाल्या अाहेत. महाराष्ट्रात जवळपास ९ ते १० लाख तर मुंबईत साडेतीन लाख परवानाधारक दुकाने अाहेत. एकट्या मुंबईतल्या दुकानांचा दररोजचा किमान सरासरी १० हजार रुपयांचा व्यवसाय गृहीत धरला तरी गेल्या काही दिवसांत सव्वातीनशे काेटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले असल्याचे शहा यांनी सांगितले.

दिवाळीमध्ये प्रत्येक दुकानाचा दिवसाला २५ हजार रुपयांचा व्यवसाय हाेताे. नाेटबंदीनंतर ग्राहकांनी अापल्याकडील नाेटा बदलणे अाणि अावश्यक तेवढी खरेदी करण्याचे धाेरण स्वीकारले अाहे. त्यामुळे खरेदीच्या एेन हंगामाच्या सुरुवातीलाच हा निर्णय झाल्यामुळे विक्रीत जवळपास ५० टक्क्यांनी घट हाेऊन ती २० हजार रुपयांवरून १० हजार रुपयांवर अाली असल्याकडे शहा यांनी लक्ष वेधले.

अाैषध विक्रेत्यांच्या व्यवसायात वाढ : अाैषधांच्या दुकानात ५००, १००० च्या नाेटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात अाली अाहे. त्यामुळे या नाेटा देताना अनेकांनी एक ते दाेन
महिन्यांच्या अाैषधांची अागाऊ खरेदी करणे पसंत केले अाहे. त्यामुळे अाैषध विक्रेत्यांच्या व्यवसायात २० टक्के वाढ झाली अाहे.

परवाना नूतनीकरणात अडचणी : दुकानांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत अाहे. या नूतनीकरणासाठी कमाल १० हजार रुपये तर किमान ३६० रुपये खर्च येताे. परंतु सध्या अार्थिक यंत्रणेत पुरेशी राेकड खेळत नसून चलन तुटवडा असल्याने ही रक्कम भरताना विशेषकरून लहान दुकानदारांना अडचणींचा सामना करावा लागणार अाहे. नाेकरांना पगाराचे पैसे देण्यातही सध्या दुकानदारांना अडचणी येत असल्याचे शहा यांनी सांगितले.

हंगामाच्या सुरुवातीलाच निर्णय झाल्यामुळे विक्रीत जवळपास ५० टक्क्यांनी घट

लहान दुकानदारांची स्थिती बिकट
राज्यात असंघटित रिटेल क्षेत्र जवळपास ९३ टक्के असून नोटाबंदीमुळे क्रेडिट कार्ड यंत्र नसलेल्या लहान दुकानदारांची बिकट अवस्था झाली अाहे. ग्राहक खरेदी करताना दाेन हजारांची नाेट पुढे करत असले तरी त्याचे सुटे देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत.

मालाची अाॅर्डर रद्द
खरेदीपेक्षा पैशाची बचत करण्याकडे लाेकांचा कल असल्याने सध्या खरेदी-विक्रीची साखळी पूर्णपणे थंडावलेली दिसत अाहे. त्यामुळे दुकानदारांनी नवीन मालाची अाॅर्डरही रद्द केली अाहे. त्यामुळे पुढील दाेन ते तीन महिने उत्पादन घटणार असल्याचा अंदाजदेखील काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
लग्नसराईच्या खरेदीत चणचणीमुळे कपात
लग्नसराईचा हंगाम सुरू झालेला असला तरी राेख रकमेच्या चणचणीमुळे वधू अाणि वर या दोन्ही पक्षांनी कमीत कमी खर्च करण्याचा पर्याय स्वीकारला अाहे. पुरेशी राेख हाती नसल्याने बहुतांश जणांनी लग्नसमारंभ जानेवारीपर्यंत पुढे ढकलणे पसंत केले अाहे. लग्नसराईतील संगीत, मेहंदी, कॉकटेल पार्टी यासारख्या कार्यक्रमांना कात्री लावली असून त्याचा विपरीत परिणाम खरेदीवर झाला अाहे. इतकेच नाही तर विवाहासाठी नवीन कपडे खरेदी करण्याऐवजी घरातले आधीचेच कपडे परिधान करण्याचा पर्याय स्वीकारणे पसंत केले अाहे. त्यामुळे लग्नाच्या मोसमातील विक्री ५० टक्क्यांनी घटली असल्याचे शहा यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...