आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेबीने 162 बनावट कंपन्यांना ‘प्रतिबंधित’ श्रेणीमध्ये टाकले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काळ्या पैशाप्रकरणी कारवाई करत सेबीने १६२ सूचिबद्ध कंपन्यांना ‘प्रतिबंधित’ श्रेणीत टाकले आहे. सेबीनुसार, या तथाकथित शेल (बनावट) कंपन्या आहेत. सेबीने सोमवारी ३३१ शेल कंपन्यांची यादी जारी केली होती. यात सर्वाधिक कंपन्या महाराष्ट्र, प.बंगाल, गुजरात व दिल्लीतील आहेत. 

१७५ कंपन्यांची एसएफआयओ चौकशी करत आहे, तर  १२४ कंपन्यांविरोधात करचोरी संदर्भात चौकशी सुरू आहे. सेबीच्या या निर्णयामुळे मंगळवारी मुंबई शेअर बाजार २५९.४८ अंकांनी तर निफ्टी ७९ अंकांनी कोसळला आणि मुंबई शेअर बाजारातील भांडवल १.४३ लाख कोटींनी घटले. देशात १५ लाख नोंदणीकृत कंपन्या आहेत. त्यापैकी ६ लाख कंपन्याच वार्षिक रिटर्न दाखल करतात. देशात ३७ हजार शेल कंपन्यांची ओळख पटली असून ३ लाख कंपन्यांची चौकशी सुरू आहे, असे पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. शेल कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे वित्त मंत्रालयाने फेब्रुवारीत स्पष्ट केले होते.
 कंपन्यांनी सेबीच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केला आहे. एसक्यूएस इंडिया बीएफएसआयच्या मते, ‘या कंपन्या नियमांचे पालन करत आहेत. तरीसुद्धा त्यांना प्रतिबंधित श्रेणीत टाकल्याने आश्चर्य वाटत आहे.’ 

प्रतिबंधित श्रेणी : महिन्याच्या पहिल्याच सोमवारी व्यवहार  
- शेअर बाजारात महिन्याच्या सोमवारीच ट्रेडिंग करता येणार. ऑगस्टमध्ये  यांच्या शेअरची खरेदी-विक्री होणार नाही.  
- प्रवर्तक, संचालक समभाग विकू शकणार नाहीत.  
- शेवटच्या शेअर किमतीपेक्षा जास्त किमतीची खरेदी-विक्री होणार नाही. 
- समभाग विकत घेणाऱ्यांना खरेदी मूल्याच्या २००% रक्कम अतिरिक्त निगराणी शुल्काच्या रूपात  ५ महिन्यांसाठी जमा करावी लागेल.  

१९ कंपन्यांचे बाजार भांडवल १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त 
सेबीने प्रतिबंध घातलेल्यांपैकी १९ कंपन्यांचे बाजार भांडवल १०० कोटींपेक्षा जास्त आहे. यापैकी तीन मोठ्या कंपन्या..
कंपनी  -   बाजार भांडवल
जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स  -  २,१४६
प्रकाश इंडस्ट्रीज  -  २,०७८
पार्श्वनाथ डेव्हलपर्स  -  १,०२०
 
स्थानिक-विदेशी गुंतवणूकदारांचे या कंपन्यांमध्ये सर्वाधिक समभाग
जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्सचे ११% समभाग म्युच्युअल फंडात, तर २७% विदेशी गुंतवणूकदारांकडे आहेत. फायडेलिटी सेक्युरिटीजकडे पार्श्वनाथ डेव्हलपर्सची ४% इक्विटी आहे. राकेश झुनझुनवाला यांचे प्रकाश इंडस्ट्रीत १%, एसक्यूएस इंडियात कल्पराज धर्मशींंचे १.६% समभाग आहेत.

पुढे काय: प्रतिबंधित कंपन्यांची सूचीबद्धता संपुष्टात येऊ शकते  
शेल कंपन्यांच्या चौकशीसाठी स्वतंत्र ऑडिटरची नियुक्ती करावी व खात्यांची फॉरेन्सिक ऑडिटिंग करावी, असे सेबीने या आधीच शेअर बाजारांना आदेश दिले आहेत. या कंपन्यांमध्ये कोणताही गैरव्यवहार आढळल्यास संबंधित कंपनीची सूचीबद्धता रद्द केली जाईल.  पुन्हा सूचीबद्ध होईपर्यंत त्यांचे पैसे डिपॉझिटरी अकाउंटमध्ये असतील.

ओळख : शेल कंपन्यांमध्ये जास्त रोख, तर खर्च कमी दाखवला जातो
शेल कंपन्यांमध्ये रोख रक्कम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते, तर खर्च कमी दाखवला जातो. बाजारामध्ये सूचीबद्ध नसलेल्या कंपन्यांत त्या गुंतवणूक करतात. आरक्षित निधीही अत्यल्प उपलब्ध दाखवले जाते. 
बातम्या आणखी आहेत...