आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा येणार एक रुपया प्रतिमिनिट कॉल दरचे दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मिनिटाला एक रुपयाप्रमाणे कॉल दराचे दिवस पुन्हा येण्याची शक्यता आहे. ध्वनिलहरींच्या (स्पेक्ट्रम) लिलावात टेलिकॉम कंपन्यांनी उच्च दरातील बोली लावल्या आहेत. त्यामुळे आगामी ८ ते १० महिन्यांत कंपन्या आपल्यावरील भार ग्राहकांच्या खांद्यावर टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॉल दरात सध्या ग्राहकांना देण्यात येणार्‍या अनेक सवलती हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय दरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) मते कंपन्यांचा स्पेक्ट्रमसाठीचा खर्च १२ ते १५ टक्क्यांनी वाढू शकतो. याचा भार कालांतराने ग्राहकांच्या खांद्यावर येण्याची शक्यता आहे.
सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक राजन मॅथ्यू यांच्या मते, येत्या आठ ते दहा महिन्यांत मोबाइलचे कॉल दर पुन्हा एकदा मिनिटामागे एक रुपया होण्याची शक्यता आहे. सध्या कॉलचे दर प्रतिमिनिट ४८ ते ५० पैशांच्या आसपास आहेत. टेलिकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रमसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागत आहे. त्यामुळे कॉलचे दर वाढवण्याचा दबाव आहे. येत्या ९ ते १२ महिन्यांत कॉलचे दर १२ ते १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
केंद्रीय दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मात्र स्पेक्ट्रम लिलावामुळे टेलिकॉम ऑपरेटरला प्रतिमिनिट १.३ पैशांचा किरकोळ भार पडणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सांगितले, स्पेक्ट्रमसाठी उच्च दरातील बोली लागल्याने कॉलचे दर वाढण्याची चर्चा आहे. मात्र आकडेवारीच्या विश्लेषणानंतर कंपन्यांवर मात्र १.३ पैसे प्रतिमिनिट असा भार पडणार आहे. देशात सध्या ९७ कोटींहून जास्त मोबाइल ग्राहक आहेत.