आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त: कारणे 'सुभिक्षा' मालकाच्या वाताहतीची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर. सुब्रमण्यम, उद्योजक
वय - ४९ वर्षे
शिक्षण - आयआयटी मद्रासमधून पदवी, आयआयएममधून एमबीए
चर्चेत - फसवणूक प्रकरणात नुकतीच त्यांना अटक करण्यात आली.


आयआयटी मद्रासमध्ये १९८७ च्या बॅचमध्ये आर. सुब्रमण्यम यांनी अव्वल क्रमांक पटकावला होता. त्यांना त्यासाठी सुवर्णपदकही मिळाले होते. वडील रिझर्व्ह बँकेत नोकरी करत होते. त्यामुळे घर आणि नोकरीचा तसा ताण नव्हता. आयआयएममधून एमबीए करण्याची इच्छा होती. त्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.

१९८९ मध्ये अभ्यासक्रम पूर्ण झाला. त्या वेळची परिस्थिती पाहता व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम करणारी मुले अमेरिका गाठत होती. मात्र, सुब्रमण्यम यांनी तिथे जाणे पसंत केले नाही. विदेशात न जाण्याचा निर्णय पूर्वग्रहदूषित हेतूने घेतला नव्हता. मात्र, जे काही करायचे ते देशातच करू, अशी त्यांची धारणा होती. असे असले तरी पाँड्सच्या चेन्नई येथील कार्यालयात त्यांची काम करण्याची इच्छा होती. मात्र, त्यात यश आले नाही. यानंतर ते मुंबईत येऊन सिटी बँकेत रुजू झाले. १५ दिवसांच्या नोकरीत मन न रमल्याने त्यावर त्यांनी पाणी सोडले आणि रॉयल एनफील्डमध्ये रुजू झाले. इथे त्यांनी दोन वर्षे घालवली. काहीतरी विशेष काम करावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे सुब्रमण्यम यांनी प्रथम विश्वप्रिया फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी सुरू केली. यामुळे त्यांच्याकडे पैशाची आवक सुरू झाली. मात्र, समाधान मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी रिटेल साखळी व्यवसाय करणाऱ्या सुभिक्षाची १९९७ मध्ये सुरुवात केली. पाहता पाहता ते भारतीय रिटेलचे पोस्टर बॉय झाले. किशोर बियाणी यांचा बिग बाजार आणि सुब्रमण्यम यांचे सुभिक्षा लोकप्रिय झाले होते. विप्रो समूहाचे प्रमुख अजीम प्रेमजीही त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यांनी सुब्रमण्यम यांच्या कामाचे कौतुकच केले नाही तर त्यांच्या कंपनीत पैसाही गुंतवला. मात्र, काही चुकीचे निर्णय होऊ लागल्यानंतर प्रेमजी यांनी टीकाही केली होती. जून २००० पर्यंत सुभिक्षाचे चेन्नईत केवळ ५० स्टोअर्स होते. २००६ पर्यंतच्या व्यवसाय विस्तारात देशभरात ही संख्या १६०० झाली होती. सुभिक्षाने एवढा व्याप वाढवला होता की चेन्नई थोड्या थोड्या अंतरावर सुभिक्षाची स्टोअर्स दृष्टीस पडत. मात्र, हा चुकीचा निर्णय होता हे नंतर उघड झाले.

सुभिक्षामध्ये आयसीआयसीआय आणि कोटक महिंद्रानेही गुंतवणूक केली. मात्र, त्यावर वाद उद्भवला. व्यवसाय झपाट्याने वाढत होता. २००५ मध्ये ३३० कोटी रुपयांचा व्यवसाय २००६ मध्ये ८३३ कोटी आणि २००७ मध्ये २३०५ कोटी रुपये झाला. २००९ मध्ये देशात २३०० स्टोअर्स झाली. मात्र, या वर्षी कंपनी परतावा देऊ शकली नाही. कर्मचाऱ्यांचे पगार रखडण्याइतपत सुभिक्षा डबघाईला आली. याच वर्षी कंपनीने मेपर्यंत १६०० स्टोअर्स बंद करण्याची घोषणा केली. येथूनच पुढे सुब्रमण्यम यांच्या वाताहतीला सुरुवात झाली. फायनान्स कंपनीच्या ४००० ठेवीदारांच्या १२०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. सुब्रमण्यम यांच्या फसवाफसवीत हा पैस बुडाला. ठेवीदारांनी पैसा मागितल्यावर वस्तुस्थिती समोर आली. ठेवीदारांच्या तक्रारीवर सुब्रमण्यम यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मद्रास उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने ते आता तुरुंगात आहेत.