आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटीतील फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवा, अर्थ मंत्रालयाचे दूरसंचार कंपन्यांना आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) प्रणाली लागू झाल्यानंतर दूरसंचार सेवा स्वस्त हाेणार असल्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे. या संबंधी नव्या व्यवस्थेमध्ये कंपन्यांना जास्त “इनपुट टॅक्स क्रेडिट’ मिळणार असल्याचे अर्थ मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच स्पेक्ट्रमवर इनपुट क्रेडिटच्या  नियमातील बदलामुळेदेखील कंपन्यांना फायदा होणार आहे. या कंपन्यांना खर्च आणि क्रेडिट यांचे नव्याने मूल्यांकन करावे लागणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

सेवांची किंमतदेखील त्याच हिशोबाने निश्चित करावी लागेल. टॅक्स क्रेडिटच्या स्वरूपात मिळणारा लाभ कमी किमतीच्या रूपात ग्राहकांपर्यंत पोहोचेल याचीदेखील दक्षता कंपन्यांना घ्यावी लागणार आहे. सध्या दूरसंचार कंपन्यांच्या सेवेवर १४ टक्के सेवा करासोबतच ०.५ टक्के स्वच्छ भारत सेस अाणि तितकाच कृषी कल्याण सेस लागतो. सेसवर इनपुट क्रेडिट मिळत नाही. जीएसटीमध्ये दूरसंचार सेवांवर १८ टक्के कर लागणार आहे. मात्र, त्याच बरोबर इनपुट टॅक्स क्रेडिटची सुविधादेखील असणार आहे. ज्या वस्तू व सेवांचा कंपन्या इनपुट म्हणून वापर करतील, त्यावर भरलेल्या करावर कंपन्यांना क्रेडिट मिळेल.  
 
स्पेक्ट्रमवरील पूर्ण क्रेडिट वर्षात घेण्याची सुविधा:  २०१६ मध्ये देण्यात आलेल्या स्पेक्ट्रमवर सध्या इनपुट क्रेडिट तीन वर्षांत घेता येते. जीएसटीमध्ये एका वर्षातच पूर्ण क्रेडिट घेण्याची सुविधा असेल. ज्या कंपन्यांमध्ये २०१६-१७ मध्ये एक तृतीयांश क्रेडिट घेतले आहे, त्या कंपन्या उर्वरित दोन तृतीयांश क्रेडिट घेऊ शकतील.
 
वाहतुकीचा वेळ वाचेल - इक्रा: जीएसटी लागू झाल्यानंतर चेक पोस्ट राहणार नाहीत, त्यामुळे वस्तुंच्या वाहतुकीचा वेळ १५ ते २० टक्के कमी होणार असल्याचे मत गुणांकन संस्था इक्राने व्यक्त केले आहे.

देशात खरेदीवर क्रेडिट  
सध्या वस्तूवर भरण्यात आलेल्या व्हॅट किंवा आयातीत वस्तूंवर विशेष अतिरिक्त शुल्कात क्रेडिट मिळत नाही. नवीन कर प्रणालीमध्ये देशात खरेदी करण्यात आलेल्या आणि आयातीत वस्तूंवर आयजीएसटीतही क्रेडिट मिळेल. हा अतिरिक्त इनपुट कर क्रेडिट दूरसंचार उद्योगाच्या टर्नओव्हरच्या सुमारे दोन टक्क्यांच्या बरोबरीत राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...