आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Company Has 18 Years Of Independent Director Wadia, Tata Motors Nano Project Cost Worth Millions: Wadia

नॅनो प्रकल्पामुळे टाटा मोटर्सचे कोट्यवधींचे नुकसान, कंपनीत 18 वर्षांपासून स्वतंत्र संचालक वाडिया यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : टाटा मोटर्सच्या नॅनो प्रकल्पाबाबत आपण रतन टाटा यांच्याशी सहमत नव्हतो, असे टाटा मोटर्सचे स्वतंत्र संचालक नस्ली वाडिया यांनी सांगितले आहे. या प्रकल्पामुळे कंपनीचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. वाडिया देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि ब्रिटानिया उद्योग समूहाचे अध्यक्ष देखील आहेत.
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे समर्थक असल्यामुळे टाटा समूहातील सर्व कंपन्यांच्या संचालक पदावरून त्यांना काढण्याची तयारी करण्यात येत आहे. त्याआधीच वाडिया यांनी सर्व शेअरधारकांच्या नावाने पत्र लिहिले आहे. टाटा मोटर्समध्ये टाटा सन्सची २६.५१ टक्के होल्डिंग आहे.

वाडिया यांनी लिहिले आहे की, २००८ मध्ये बाजारात येण्याआधी नॅनोचा एक लाख रुपयांच्या कारच्या स्वरूपात प्रचार करण्यात आला. आता २.२५ लाख रुपयांच्या किमतीवरही कार विक्रीही होत नाही किंवा यामुळे कंपनीला उत्पन्नही होत नाही. या किमतीवरदेखील कंपनीला नुकसान सहन करावे लागत आहे. ही कार बाजारात येताच ती चालणार नाही, असे समजले होते.
त्यामुळे या प्रकल्पाला निधी देण्यासाठी मी विरोध केला होता. २०१५-१६ मध्ये २.५ लाख कर बनतील, असा विचार करून गुंतवणूक करण्यात आली होती. मात्र वास्तवात फक्त २०,००० कार तयार झाल्या. आता तर त्यापेक्षाही कमी कार बनत आहेत.

टाटा सन्सने केलेल्या आरोपांना नकार देत वाडिया यांनी लिहिले की, मी १८ वर्षांपासून टाटा मोटर्सचा स्वतंत्र संचालक आहे. मला काढण्याच्या प्रस्तावाचा माझ्या कामाशी किंवा व्यवहाराशी काहीही संबंध नाही. कोणत्याही कर्मचाऱ्याला, व्यवस्थापकाला किंवा संचालकाला माझ्याविषयी तक्रार नाही.
टाटा सन्सचे अध्यक्ष बदलल्याच्या भावनेने कारवाई करत आहेत. मिस्त्री यांच्या कामाची प्रशंसा करत वाडिया यांनी पॅसेंजर व्हेइकल बिझनेसमध्ये दोन वर्षांत जागतिक पातळीवरील व्यावसायिक तंत्र वापरले असल्याचे सांगितले.

टाटा टेलिसर्व्हिसेसमधूनही मिस्त्रींना काढले : टाटा टेलिसर्व्हिसेसच्या संचालक आणि अध्यक्षपदावरूनही बुधवारी सायरस मिस्त्रींना काढण्यात आले. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार शेअरधारकांच्या ईजीएममध्ये हा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. टाटा टेलीमध्ये होल्डिंग कंपनी टाटा सन्सची ३६.१७ टक्के भागीदारी आहे.
या आधी मंगळवारी टीसीएस आणि सोमवारी टाटा इंडस्ट्रीजच्या ईजीएममध्ये मिस्त्रींना काढण्याचा निर्णय झाला आहे.

आता या पाच कंपन्यांची ईजीएम : टाटा हॉटेल्स, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा केमिकल्स, टाटा पाॅवर
टीसीएसमधील ७० टक्के नॉन-प्रमोटर शेअरधारक माझ्यासोबत : सायरस मिस्त्री
टीसीएसच्या ईजीएममध्ये कंपनीचे ७० टक्के नॉन-प्रमोटर शेअरधारक माझ्या बाजूने होते, असा दावा सायरस मिस्त्री यांनी केला आहे. यावरून अल्पसंख्याक शेअरधारकांना कंपनीत सुव्यवस्थापन हवे आहे, असे सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले.
टीसीएसमध्ये टाटा सन्सचा ७३.३ टक्के हिस्सा आहे. टाटा समूहातील हा बदलाचा मुद्दा मी विविध पातळीवर उपस्थित करत राहणार असल्याचे मिस्त्री यांनी सांगितले.
टीसीएसच्या ईजीएमनंतर त्यांनी शेअरधारकांना धन्यवाद पत्र लिहिले असून यामध्ये हा दावा केला आहे. त्यांनी लिहिले की, ७८ टक्के किरकोळ गुंतवणूकदार तसेच ४३ टक्के संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांना काढण्यास विरोध केला आहे.
मंगळवारी टीसीएसने ईजीएममध्ये ९३.११ टक्के शेअरधारकांनी मिस्त्री यांना काढण्यासाठी तर ६.८९ टक्क्यांनी विरोधात मतदान केल्याचे सांगितले होते. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार कंपनीमध्ये मिस्त्रींची ०.२१ टक्के होल्डिंग आहे.
बातम्या आणखी आहेत...