मुंबई - देशातील सर्वात मोठी कंपनी टीसीएसचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ नटराजन चंद्रशेखर यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. उद्योग जगतात ‘चंद्रा’ नावाने प्रसिद्ध चंद्रशेखरन २१ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारतील. कंपनीने गुरुवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. १४८ वर्षे जुन्या टाटा समूहाचे ते पहिले गैरपारशी चेअरमन असतील. टाटा सन्स, टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी आहे. चंद्रशेखरन यंाच्या कार्यकाळाबद्दल कंपनीने जारी केलेल्या पत्रकात काहीही सांगितले नाही.
रतन टाटा यांची भूमिका काय असेल त्याबाबतही काही नाही.
८० दिवसांपूर्वी २४ ऑक्टोबर २०१६ रोजी सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हटवले होते. रतन टाटा यांना प्रभारी चेअरमन करत एक समिती नेमली. समितीस चार महिन्यांत नव्या चेअरमनची निवड करण्यास सांगितले होते. पाचसदस्यीय समितीत रतन टाटा यांच्याशिवाय टीव्हीएस ग्रुपचे प्रमुख वेणू श्रीनिवासन, बेन कॅपिटलचे एमडी अमित चंद्रा, अमेरिकेतील माजी राजदूत रोनेन सेन व स्वतंत्र सल्लागार लॉर्ड सुशांतकुमार भट्टाचार्य होते. चंद्रशेखरन यांच्या नावावर समितीच्या सर्व सदस्यांनी संमती दर्शविली.
पत्रकामध्ये टाटा सन्सच्या बोर्डाने म्हटले की, टीसीएसचे एमडी व सीईओ म्हणून चंद्रशेखरन यांनी उत्कृष्ट नेतृत्व क्षमता दाखवून दिली. ते टाटा ग्रुपलाही याच पद्धतीने प्रेरणा देतील,अशी आम्हाला आशा आहे.
२१ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारणार
चंद्रशेखरनच का ?
चंद्रशेखरन रतन टाटा यांचे निकटवर्तीय मानले जातात. २००९ मध्ये ते टीसीएसचे सीईओ झाले. याआधी २००८ मध्ये ग्रुपच्या बाजार मूल्यात टीसीएसचा वाटा ३५ % च्या जवळपास होता. आता तो ६२% आहे. टाटा समूहाचे भांडवल सुमारे ७.५ लाख कोटी रुपये आहे. यामध्ये ४.६ लाख कोटी केवळ टीसीएसचे आहेत. म्हणजे ग्रुपचा अर्ध्यापेक्षा जास्त व्यवसाय चंद्रा सांभाळत होते. २०१४-१५ मध्ये ग्रुपच्या एकूण महसुलात १५.६%, नफ्यात ६३% व लाभांशामध्ये ८७.५% वाटा टीसीएसचा होता.