आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवग्याची आवक घटूनही दर 2000 रुपयांनी घसरले, महिनाभरात दरामध्ये प्रचंड घसरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 औरंगाबाद-कमी पाणी, कमी खर्च आणि कमी वेळात येणारा शेवगा शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. बारमाही येणारा शेवगा औरंगाबाद परिसरात जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होतो. आवक कमी असल्याने शेवग्याचे दर वाढलेले असतात. मात्र, यंदा अावक घटूनही शेवग्याचे पीक घाट्याचा सौदा ठरतेय. महिनाभरात बाजारपेठेत शेवग्याची आवक स्थिर असतानाही दरात मात्र तब्बल २ हजार रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा  मावळल्या आहेत. तर महिनाभरात दर वाढण्याचा आशावाद व्यापारी व्यक्त करत आहेत.  

शेवगा हा दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. खर्च वजा जाता एकरी ७० ते ८० हजार रुपये किमान उत्पन्न देणारे हे वृक्षवर्गीय पीक शेतकऱ्याला आधार देणारे आहे. आंबा, चिकू, आवळा अशा फळबागेत आंतरपीक म्हणून शेवग्याची लागवड केली जाते. गेल्या १० वर्षांत शेवग्याच्या लागवडीने मराठवाड्यात चांगलीच उचल घेतली आहे. औरंगाबादसह जालना, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेडमध्ये शेवग्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. औरंगाबाद जिल्ह्यातील अौरंगाबाद तालुका, फुलंब्री, आणि सिल्लोड शेवग्याच्या लागवडीसाठी महत्त्वाची समजली जातात. गुजरातेत  शेवग्याची मोठी बाजारपेठ आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच इंदूर, सुरत, भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर, चेन्नई, केरळ आणि संपूर्ण दक्षिण भारतासह उत्तर प्रदेश येथे शेवग्याची निर्यात केली जाते.
   
ऑगस्टच्या सुरुवातीला औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत १३ क्विंटल शेवग्याची आवक झाली. या वेळी ४५०० रुपयांपर्यंत दर शेतकऱ्यांना मिळाला. मात्र, नंतर शेवगा घसरतच गेला. १९ ऑगस्ट रोजी महिनाभरातील सर्वाधिक २७ क्विंटल आवक झाल्याने शेवग्याचे दर २५०० रुपयांवर आले. २८ अॉगस्टला १२ क्विंटल माल आला. तरी दर २६०० रुपयेच होते. आज २ सप्टेंबरला बाजारात केवळ ६ क्विंटल शेवग्याची आवक  झाली. तरी शेवगा २५०० रुपयांवरच होता.  

याबाबत शेवगा उत्पादक शेतकरी कचरू मोरे  यांनी सांगितले की, या हंगामामाध्ये पहिल्या पावसाचा जोर वाढल्याने पालेभाज्या सडल्या. अर्धी भाजी बाजारात पोहोचण्याआधी वाया गेली. यामुळे आमच्या आशा शेवग्यावर होत्या. विशेषत: महालक्ष्मीच्या सणात शेवगा भाव खाण्याची अपेक्षा असताना तो सामान्यच राहिला. होलसेल भाजी व्यापारी मनोज पाटणी म्हणाले, हा कृषी उत्पन्न बाजार समितीतील दर असला तरी रिटेलमध्ये शेवगा चांगला भाव देतोय. महिनाभरात शेवग्याचे दर दुुपटीने वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
जुलैत अपेक्षित आवक झाली नाही
शेवग्याच्या लागवडीसाठी २५ ते ३० डिग्री तापमान पोषक असते. ४० डिग्रीपेक्षा जास्त तापमान असल्यास फुलगळ होते. हलक्या व माळरान जमिनीत शेवग्याची लागवड करता येते.  चांगले उत्पन्न मिळण्यासाठी थोडे पाणी आवश्यक आहे. या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे मार्च, एप्रिल व मे महिन्यात अजिबात पाणी मिळाले नाही तरी ते जळत नाही. औरंगाबाद परिसरात जुलैमध्ये खऱ्या अर्थाने शेवग्याच्या शेंगा बाजारात येतात. येताना त्याचे दर अधिक राहतात, तर पुरवठा वाढल्यामुळे दर घटतात. यंदा मात्र पुरवठा घटनूही दर घटलेलेच आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.  
बातम्या आणखी आहेत...