आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्वासित शिबिरात जन्म, शिक्षण सुटले; खेळण्यांच्या उद्योगातून बनले अब्जाधीश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅनी स्टूल यांनी १७ वर्षांपूर्वी म्हणजे २००१ मध्ये एका दिवाळखोरीत निघालेल्या खेळणी उत्पादन कंपनी, मूस टॉयला खरेदी केले होते. गेल्या काही वर्षांत या कंपनीच्या उत्पादनांची विक्री ७००० % नी वाढली. यापूर्वी त्यांनी एक गिफ्टवेयर कंपनी सुरू केली होती. मात्र तिला विकले. त्यानंतर अनेक उद्योगांमध्ये भाग्य आजमावले. यात नैसर्गिक पद्धतीने शेतीचाही उद्योग होता. नंतर मूसमध्ये गुंतवणूक केली. या कंपनीने त्यांना जगातील श्रीमंतांच्या यादीत पोहाेचवले. आज त्यांची संपत्ती १.३३ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे. त्यांची गणना ऑस्ट्रेलियाच्या अग्रणी २५ श्रीमंतांमध्ये होते.  
 
मूसची सर्वात प्रसिद्ध खेळणी आहे- शॉपकिन्स. ही छोटी बाहुली आणि इतर खेळण्यांची श्रेणी आहे. विविध अॅक्सेसरिज, नाव आणि कथांसह ही विकली जाते. ही खेळणी आज ८० देशांतील मुलांना आवडतात. १० छोट्या शॉपकिन खेळणींच्या संचाची किंमत अंदाजे १४ डॉलर आहे.  
स्टूल यांच्या प्रगतीचा प्रवास मोठा रंजक आणि संघर्षमय आहे. आजचा हा अब्जाधीश दुसऱ्या महायुद्धाच्या काळात शरणार्थी शिबिरात जन्माला आला. त्यांचे पालक पोलंडमध्ये राहत असत. हिटलरच्या हॉलकॉस्टमधून जीव वाचवून त्यांनी १९४९ मध्ये पलायन केले होते. हिटलरने या हॉलकॉस्ट म्हणजेच छळ छावण्यांमध्ये लाखो ज्यूंची कत्तल केली होती. ते ७ महिन्यांचे असताना त्यांचे कुटुंब समुद्रमार्गाने ऑस्ट्रेलियात दाखल  झाले. तीन वर्षे हे कुटुंब येथील शरणार्थी शिबिरात आश्रयाला होते. नंतर ते पर्थला आले. सुरुवातीला त्यांच्या कुटुंबात कोणालाही इंग्रजी अवगत नव्हते. पर्थमध्ये हे कुटुंब एका खोलीत, इतर तीन शरणार्थी कुटुंबासह राहू लागले. त्यांच्या वडिलांना कॅबिनेट तयार करण्याचे काम मिळाले. त्यांनी सांगितले की, माझे कुटुंब मूल्यांवर निष्ठा ठेवणारे होते. आई-वडिलांनी प्रचंड श्रम उपसले.  
 
स्टूल पर्थ येथे शाळेत जाऊ लागले. मात्र उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेता घेताच कुटुंबाच्या मदतीसाठी शिक्षण सुटले. काम करणे भाग होते. १९७४ मध्ये त्यांनी एक छोटी गिफ्टवेअर कंपनी सुरू केली. स्कानसेन असे या कंपनीचे नाव होते. १९९३ मध्ये ही कंपनी दीड कोटी डॉलर्सच्या श्रेणीतील कंपनी झाली होती. यानंतर काही काळ ते जग भ्रमंतीवर गेले. वर्ष २००० मध्ये मूस टॉयमध्ये त्यांनी गुंतवणूक केली. १९८५ पासून ही कंपनी अस्तित्वात होती. या कंपनीत १० कर्मचारी होते. येथील कार्य संस्कृती चांगली नव्हती. त्यांनी पूर्ण कर्मचारी बदलले. विचारविनिमय करणे,नव्या प्रयोगांवर भर दिला. नंतर अॅक्वासेंड नामक त्यांचे एक उत्पादन यशस्वी ठरले. मायटी बेंझ नावाचे उत्पादन देखील पसंत केले गेले. २००७ मध्ये कंपनीसमोर मोठे संकट आले. कंपनीची खेळणी वापरणारी मुले आजारी पडून दवाखान्यात दाखल होऊ लागली. कंपनीने आऊटसोर्स केलेल्या कामामुळे हे घडले. ती कंपनी प्रतिबंधित डिंकाचा वापर करत होती. १० दिवसांत त्यांनी ३५ वितरक आणि इतर संबंधीत लोकांच्या भेटी घेतल्या. नवी खेळणी बाजारात उतरवली. तपासाची पूर्ण प्रक्रिया रीतसर केली. २०१५ मध्ये मोजे टॉयने शॉपकिन्स बाजारात उपलब्ध करवून दिले. २०१५ मध्ये खेळणी उद्योग संघटनाने याला ‘ गर्ल टॉय ऑफ ईयर’ चा पुरस्कार दिला.

-  ६० कोटी डॉलर्सची उलाढाल, कंपनीत ३०० कर्मचारी  
- १७ वर्षांत ७००० % वाढ, ८० देशांमध्ये खेळण्यांची विक्री  
- शरणार्थी म्हणून ऑस्ट्रेलियात दाखल, आज १.३३ अब्ज डॉलर्सची संपत्ती