आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TV Subscribers Without Set Top Boxes Lose Cable Services

टीव्हीला "सेट टॉप बॉक्स' न बसवणाऱ्यांची सेवा खंडित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यातील केबल टी.व्ही. धारकांनी सेट टॉप बॉक्स बसवण्यासाठी ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात अाली होती. सेट टॉप बॉक्स न बसवणाऱ्या केबल टी.व्ही. चालकांची सेवा खंडित करण्यात आली असल्याने या केबल चालकांची सेवा घेणाऱ्या पावणेनऊ लाख ग्राहकांच्या घरी टीव्हीवरचे कार्यक्रम दिसणार नाहीत. भविष्यात ही सेवा पूर्ववत करण्यासाठी तातडीने केबल टीव्हीचे डिजिटायझेशन करून घ्यावे, असे आवाहन महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी केले.

सेट टॉप बॉक्स न बसवणाऱ्या टीव्ही केबल चालकांचे डिजिटायझेशनच्या अभावी ॲनालॉग सिग्नल बंद करण्यात आले असून त्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे. राज्यात सेट टॉप बॉक्स न बसवणाऱ्या ग्राहकांची संख्या पावणेनऊ लाख असल्याचे महसूलमंत्री खडसे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. ‘केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिसूचनेअन्वये जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यात राबवण्यात येणाऱ्या केबल टी.व्ही. डिजिटायझेशन टप्पा-तीन या कार्यक्रमाची अंमलबजावणी ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत करावयाची होती. तथापि, हा कार्यक्रम विहित कालावधीमध्ये पूर्ण न झाल्याने या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार केबल टी.व्ही. डिजिटायझेशनच्या अनुषंगाने राज्यातील नागरिकांना ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत सेट टॉप बॉक्स बसवण्याचे आवाहन करण्यात आले होते; परंतु अनेक ठिकाणी संबंधित केबल टी.व्ही. सेवा पुरवणारी कंपनी, बहुविध यंत्रणा परिचालक (एम.एस.अाे.) आणि स्थानिक केबल परिचालक (एल.सी.अाे.) यांच्याद्वारे या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली नाही,’ असे खडसे यांनी सांगितले.