आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Budget: Ministry For Tax Policy For Tobacco Products

अर्थसंकल्प : तंबाखूजन्य पदार्थांवरील कर वाढवण्याची शिफारस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विडी,सिगारेट तसेच अन्य तंबाखूजन्य उत्पादनांच्या किमती आगामी एप्रिल महिन्यापासून वाढण्याची शक्यता आहे. आरोग्यास घातक असलेल्या सर्व तंबाखूजन्य उत्पादनाला जीवघेणे ठरवत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आगामी अर्थसंकल्पात त्यांच्यावर कर वाढवण्याची मागणी केली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या मते, तंबाखूवरील सध्या तुटपुंजे कर आहे. कर वाढल्याने साहजिकच किमती वाढतील. भारतातील सुमारे २७ कोटी ५० लाख लोक तंबाखूचे सेवन करतात. आरोग्य सचिव बी. पी. शर्मा यांनी अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाचे सचिव डॉ. हसमुख अधिया यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. स्वस्त असल्यामुळे गरीब लोक अशा पदार्थांचे जास्त सेवन करत आहेत, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. सिगारेटसोबतच विडीवरील करसवलत संपुष्टात आणून किमती वाढवाव्यात असेही यात म्हटले आहे.

ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे २०१० तील शिफारशींचा उल्लेखही त्यांनी पत्रात केला आहे. या प्रकरणाशी संबंधित एका अन्य अधिकाऱ्याच्या मते, भारतातील सुमारे ८० टक्के असंसर्गजन्य आजाराचे मूळ तंबाखूजन्य उत्पादनांचे सेवनच आहे. भारताने जागतिक आरोग्य संघटनेद्वारा तयार करण्यात आलेल्या फ्रेमवर्क कन्व्हेंशन ऑन टोबॅको प्रॉडक्ट्सवर स्वाक्षरी केली आहे. त्यानुसार तंबाखूजन्य उत्पादनांवर जास्त कर लावून त्यांची मागणी घटवण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. त्यामुळेच आरोग्य मंत्रालयाने आगामी अर्थसंकल्पात याबाबत कर वाढवण्याची विनंती अर्थ मंत्रालयास केली आहे.

तंबाखूजन्य पदार्थ सेवनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे, तर तंबाखूजन्य उत्पादनाच्या बाबतीत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. देशातील सिगारेट आणि विडीवर सध्या अत्यल्प कर आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या ७० टक्के विडी उत्पादनांवर कर अत्यल्प किंवा काहीच नाही. शिवाय, दर हजार सिगारेटची लांबी आणि फिल्टरच्या हिशोबाने करवसुली केली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिगारेटचे दरही भारतात खूपच कमी आहे.