आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक घडामोडी, निकालावर राहणार नजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदा सरासरीपेक्षा चांगला पाऊस होण्याची शक्यता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील वातावरणात होणारी सुधारणा यामुळे देशातील शेअर बाजारात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी चांगली तेजी दिसून आली. त्यातच हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेनेही यंदा १०५ टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस विविध प्रकारच्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या मागणीत वाढ करण्यात मोलाची भूमिका वठवतो. कारण देशातील १.३ अब्ज लोकसंख्येपैकी ७० टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. शेअर बाजारातील सकारात्मक बातमीच्या दुष्काळात ही बातमी उत्तम ठरली. कृषी क्षेत्राशी निगडित कंपन्यांच्या समभागांत चांगली तेजी दिसून आली. जैन इरिगेशन सिस्टिम्समध्ये ६ टक्के, तर इन्सेक्टिसाइड्स (इंडिया) लिमिटेडच्या समभागात १७ टक्के तेजी दिसून आली. ग्रामीण मागणीत वाढीच्या शक्यतेने दुचाकी वाहने बनवणारी हीरो मोटोकॉर्प आणि ग्राहकोपयोगी साहित्य उत्पादक हिंदुस्तान युनिलिव्हरचे समभाग अनुक्रमे २.५३ टक्के आणि ०.९५ टक्के वाढीसह बंद झाले. मात्र, एकंदरीत पाहता बाजारातील तेजी मर्यादित राहिली, कारण इन्फोसिससह कंपन्या आपला तिमाही निकाल जाहीर करण्याच्या तयारीत गुंतल्या आहेत. इन्फोसिस शुक्रवारी आपल्या उत्पन्नाची आकडेवारी सादर करणार आहे. तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळेही बाजारात तेजी दिसून आली. सोमवारी कच्चे तेल पिंपामागे ४० डॉलरच्या पार गेले. यामुळे ऊर्जा क्षेत्रातील कंपनीच्या समभागात तेजी दिसून आली.
देशाअंतर्गत आघाडीवर किरकोळ महागाई दर अपेक्षेपेक्षा जास्त घसरून ४.८३ टक्क्यांवर आला. यामुळे रिझर्व्ह बँकेला व्याजदर कपातीला वाव आहे. मंगळवारी शेअर बाजारातील व्यवहार संपल्यानंतर आलेल्या या वृत्तामुळे बुधवारी शेअर बाजारात मोठी तेजी आली. एकूणच, मागील आठवड्यात चांगला मान्सून, किरकोळ महागाईतील घसरण आणि औद्योगिक उत्पादनातील वाढ यांसारख्या चांगल्या बातम्यांमुळे बाजाराला चांगला आधार मिळाला. मात्र, वास्तविक आकडेवारीचा परिणाम बाजार आणि निर्देशांकावर दिसून येईल. बाजाराची धारणा सतर्कतेसह सकारात्मक झाली आहे. व्यापकदृष्ट्या धारणा अद्यापही सतर्क आहे. तेजीबाबत सांगायचे झाले तर, निफ्टीला पहिला अडसर ७७७८ या पातळीच्या आसपास होईल. हा एक चांगला अडसर राहील, मात्र निफ्टीने ही पातळी पार केल्यास चांगल्या तेजीची शक्यता दुणावेल. त्यानंतर निफ्टीला ७८५७ च्या आसपास पुढील अडथळा होण्याची शक्यता आहे. घसरणीत निफ्टीला ७६४४ अंकांच्या आसपास पहिला आधार मिळण्याची शक्यता आहे. ही एक महत्त्वाची आधार पातळी राहील. समजा निफ्टी या पातळीखाली येऊन बंद झाला तर आणखी घसरण दिसून येईल. अशात निफ्टीला ७५८६ च्या आसपास आधार मिळेल. हा महत्त्वाचा असून, यावर बारकाईने नजर ठेवायला हवी. समभागांच्या बाबतीत सांगायचे झाले तर या आठवड्यात सन फार्मा आणि अल्ट्राटेक सिमेंट चार्टवर उत्तम दिसताहेत. सन फार्माचा सध्याचा बंद भाव ८२३.६० रुपये आहे. तो ८३८ रुपयांपर्यंत वाढू शकतो, घसरणीत याला ८०९ रुपयांवर आधार आहे, तर अल्ट्राटेक सिमेंटचा सध्याचा बंद भाव ३१६६.४० रुपये आहे. तो ३२१४ रुपयांपर्यंत वाढू शकतो. घसरणीत त्याला ३२०८ वर आधार आहे.
विपुल वर्मा,
लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.comचे सीईओ आहेत. vipul.verma@dbcorp.in