आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील समुद्रात पवन ऊर्जा क्षेत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निवडणुकीच्या काळात दिलेले २४ तास विजेचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी माेदी सरकार नव्या विकल्पाच्या शोधात आहे. या अंतर्गत आता समुद्रात पवन ऊर्जा क्षेत्र तयार करून वीज निर्माण करण्याचा विचार सुरू आहे. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (एमएनआरई) लवकरच याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवणार आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातदेखील समुद्र किनार्‍यापासून दूर पवन ऊर्जा प्रकल्प िवकसित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वर्ष २०२२ पर्यंत सर्वांच्या घरी २४ तास वीज देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारच्या वतीने नवे विकल्प शोधण्याचे काम सुरू आहे. आता सरकारने समुद्राच्या आत पवन ऊर्जा क्षेत्र (विंड एनर्जी फार्म) उभे करून वीजनिर्मितीचा प्रकल्प विकसित करण्याची तयारी केली आहे. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने यासाठी अहवाल तयार केला आहे.

समुद्रात टर्बाइन लावणार
पवन ऊर्जाचे ऑनशोर आणि आॅफशोर असे दोन प्रकार असतात. सध्या देशात समुद्राच्या किनार्‍यावरील खुल्या जागेत टर्बाइन लावून पवन ऊर्जा निर्माण केली जाते. याला ऑनशोर पवन ऊर्जा म्हणतात. या माध्यमातून आतापर्यंत २० हजार मेगावॅटपेक्षा जास्त विजेचे उत्पादन घेतले जात आहे. सरकारच्या अंदाजानुसार वर्ष २०३१ पर्यंत ऑनशोर पवन ऊर्जेच्या माध्यमातून १ लाख ९१ हजार मेगावॅट वीज मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आता मंत्रालयाने समुद्रामध्ये टर्बाइन लावण्याची नवी योजना आखली आहे. याला ऑफशोर पवन ऊर्जा म्हणतात.

यासाठी मंत्रालयाने जागतिक अनुभव असलेल्या तज्ज्ञांची समिती तयार केली आहे. आॅफशोर पवन ऊर्जा प्रकल्पासाठी आम्ही खूप उत्साही असल्याचे मत मंत्रालयातील एका अधिकार्‍याने व्यक्त केले. या कामाला पुढील वर्षी सुरुवात करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळेच या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यावर तत्काळ हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी स्वतंत्र ऑफशोर पवन ऊर्जा प्राधिकरण बनवले जाणार आहे.

समुद्रामध्ये करणार विकसित
समुद्रतटापासून जवळपास १२ समुद्री मिल (जवळपास २२ किलोमीटर) आत हा पवन ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. यासोबतच जवळपास २०० समुद्री मिलच्या जवळ संशोधन आणि विकासासाठी विकसित केले जाईल.

महाराष्ट्रात प्रकल्पाची शक्यता
मंत्रालयाच्या अहवालानुसार सध्या तामिळनाडूतील रामेश्वरमच्या उत्तरेला आणि कन्याकुमारीच्या दक्षिणेला २००० मेगावॅट वीज उत्पादन घेणे शक्य आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ऑफशोर पवन प्रकल्प लावले जातील. आॅफशोर पवन प्रकल्प ऑनशोर पवन प्रकल्पापेक्षा दीडपट महाग आहे. कारण समुद्राच्या आत टर्बाइन लावण्याचा खर्च वाढणार आहे. तसेच ऑनशोर पवन प्रकल्पापेक्षा ऑफशाेर पवन ऊर्जा प्रकल्पातील एका टर्बाइनमध्ये ३ ते ५ मेगावॅट अधिक वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे.
बातम्या आणखी आहेत...