आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगाची आर्थि‍क महामंदीकडे वाटचाल सुरू : रघुराम राजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा आर्थिक महामंदीकडे जात असल्याची शंका रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे. १९३० मध्ये आलेल्या महामंदीप्रमाणेच जगातील अर्थव्यवस्था पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत राजन यांनी जगभरातील केंद्रीय बँकांना अर्थव्यवस्थेसाठी नवे नियम तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत.

सर्व सेंट्रल बँकांनी पतधोरणात शिथिलता दाखवल्याबद्दल राजन यांनी शंका व्यक्त केली आहे. वास्तविक भारतातील परिस्थिती वेगळी असल्यामुळे येथे गुंतवणूक वाढवण्यासाठी व्याजदर कमी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जगभरातील सर्वच देश १९३० सारख्या महामंदीकडे जात असून यावर उपाय करण्यासाठी एक समान योजना बनवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

गुंतवणूक आवश्यक : भारतीय दृष्टिकोनातून विचार केल्यास व्याजदर कमी करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. भारतासाठी विदेशी गुंंतवणूक होणे आवश्यक आहे. त्यासाठी व्याजदर कमी करण्याचा दबाव असल्याचे ते म्हणाले. मात्र, व्याजदर कमी केल्यास गुंतवणूक वाढेल का, याविषयी विचार करत आहोत असे ते म्हणाले. इतर अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्थेत बराच फरक असल्याचेही ते म्हणाले. सर्व केंद्रीय बँकांनी मिळून जागतिक पातळीवर नीती तयार करण्याची आवश्यकता असल्याचे मत राजन यांनी व्यक्त केले. लंडन बिझनेस स्कूल (एलबीएस) मध्ये आयोजित एका परिसंवादात ते बाेलत होते.

जीडीपीत १५ टक्के घट
"ग्रट डिप्रेशन'ची सुरुवात २९ ऑक्टोबर १९२९ मध्ये अमेरिकत शेअर बाजारातील पडझडीने झाली. याचा परिणाम १९३९ पर्यंत राहिला. त्याचा परिणाम जगभरात दिसून आला. चार वर्षांत जागतिक जीडीपी १५ टक्के आणि व्यापार ५० टक्के कमी झाला होता. प्रत्येक देशातील नागरिकाचे उत्पन्न कमी झाले आणि बेरोजगारी वाढली होती.
बातम्या आणखी आहेत...