आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वर्षी १७ टक्क्यांनी घटणार सोन्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत हा जगातील सर्वाधिक सोन्याची विक्री होणारा देश आहे. मात्र, २०१५ मध्ये सलग दुसर्‍या वर्षी देशातील सोन्याची मागणी घटण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे सोन्याच्या उतरत्या किमतीने त्याच्या खरेदीला लगाम लागला आहे.

जाणकारांच्या मते, देशातील एकूण मागणीपैकी ग्रामीण भागातून दोनतृतीयांश मागणी येते. गावात सोन्याकडे रोकड म्हणून पाहतात. मात्र, यंदा ग्रामीण भागात पैशांची चणचण आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून यंदा सोन्याची खरेदी कमी होईल. अनेक शेतकरी नवीन दागिने खरेदी करण्याऐवजी जुन्या दागिन्यांना नवे रूप देण्यावर भर देत आहेत. भारतातील मागणी घटल्याने सोन्याच्या जागतिक स्तरावरील किमतीवरही परिणाम होऊ शकतो. अमेरिकेतील व्याजदराची संभाव्य वाढ आणि चीनमधील मागणीत घट यामुळे सोन्याच्या किमतींना संघर्ष करावा लागत आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनचे उपाध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांच्या मते, यंदा सोन्याची मागणी ७०० टनांपर्यंत घटण्याची शक्यता आहे.

वर्ष २०१४ मध्ये मागणी ८४२.७ टन होती. यंदाच्या सुरुवातीला जागतिक सुवर्ण परिषदेने (डब्ल्यूजीसी) २०१५ मध्ये भारतातील मागणी ९०० ते १००० टन राहण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, रब्बी िपकांच्या नुकसानीमुळे सोन्याची मागणी घटण्याची शक्यता वाढली आहे.

याशिवाय सरकारने एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त सोने खरेदीसाठी पर्मनंट अकाउंट नंबर (पॅन) अनिवार्य केले आहे. यामुळेही सोन्याच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पी. पी. ज्वेलर्सचे संचालक राहुल गुप्ता यांच्या मते, ग्रामीण भागात फारच कमी लोकांकडे पॅन असते. अशात सरकारच्या बंधनामुळे सोन्याच्या मागणीत घट येण्याची शक्यता आहे.
मागणी घटण्याची कारणे
- रब्बी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांचे उत्पन्न घटले
- एक लाख रुपयांपेक्षा जास्त सोने खरेदीसाठी पॅन अनिवार्य
- शेअर बाजारातील गुंतवणुकीत जास्त रस
- सोन्याच्या किमतीत घसरणीचा कल

३१ मार्च अखेर स्थिती
- सेन्सेक्स : २५ टक्के वाढ
- निफ्टी : २६ टक्के वाढ
- सोने : ८ टक्के घट