नवी दिल्ली - बीएसएनएलचे ग्राहक लवकरच
आपल्या मोबाइल फोनवरूनच खरेदी करू शकणार आहेत. कारण कंपनी एअरटेल, व्होडाफोनसारख्या टेलिकॉम कंपन्यांप्रमाणेच एम-वॉलेट सेवा सुरू करणार आहे. यासाठी कंपनीने देशात सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक आणि आंध्रा बँकेसोबत करार केला आहे. एम-वॉलेट प्रीपेड मोबाइल कार्डसारखी सेवा आहे, ज्यात तुम्ही दूरसंचार कंपनीच्या माध्यमातून मोबाइल फोनद्वारे खरेदी करू शकता.
भारत संचार निगम िलमिटेड (बीएसएनएल) या सरकारी कंपनीच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, कंपनी लवकरच आपली एम-वॉलेट सेवा सुरू करणार आहे. ज्याचा लाभ कंपनीच्या १० कोटींपेक्षा जास्त ग्राहकांना मिळणार आहे. यासाठीच कंपनीने एसबीआय आणि आंध्रा बँकेसोबत करार केला आहे.
अर्ज करावा लागेल
ही सेवा सुरू करण्यासाठी ग्राहकाला अर्ज करावा लागेल. एम-वॉलेट सेवेसाठी सर्व ग्राहकांना स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे. या माध्यमातून कंपनी ग्राहकांकडून केवायसी अर्ज भरून घेणार आहे, ज्यानंतर कंपनी तुमच्या सिमकार्डवर एम-वॉलेट सेवा सुरू करेल. पैशांच्या व्यवहारासाठी एटीएमप्रमाणे तुम्हाला पिनकोड नंबर देण्यात येईल. पिनकोड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एम-वॉलेट सेवेचा लाभ घेता येणार आहे.
खरेदी होणार सोपी
एम-वॉलेट सेवा दूरसंचार कंपनी आणि बँक यांच्या संयुक्त विद्यमाने पुरवली जाते. एम-वॉलेट सेवा वापरणारा ग्राहक ज्याप्रमाणे कोणत्याही दुकानावर जाऊन आपला प्रीपेड फोन रिचार्ज करतो, त्याच पद्धतीने एम-वॉलेटमध्ये आपले पैसे जमा करू शकतो. एकदा पैसे जमा झाले, तर या माध्यमातून ग्राहक त्याचे बिल भरणे िकंवा खरेदीदेखील करू शकतो. त्यामुळे खरेदी करणे अधिक सोपे होणार आहे.