भारतात स्वायत्त कार तंत्रज्ञान लवकरच वास्तव रूपात अवतरणार आहे. यासाठीच्या पेटंटची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दिशेने सर्वात पहिले जपानच्या कार निर्माता कंपनी निसान मोटर्सने पाऊल टाकले आहे. निसानने भारतात स्वायत्त कार तंत्रज्ञानासाठी पेटंट अर्ज दाखल केला आहे. फेब्रुवारीमध्ये कंपनीने प्रक्रिया सुरू केल्याचे कळते. निसानने इलेक्ट्रॉनिक सबसिस्टिम्ससाठी अर्ज दाखल केला आहे. या तंत्रज्ञानात कारमध्ये रस्त्याची स्थिती आेळखणारे सेन्सर लावले जातात.
एक पेटंट असेही
निसानने आणखी एका पेटंटसाठी अर्ज केला आहे. यात पोझिशन सेल्फ कॅल्क्युलेशन डिव्हाइसचादेखील समावेश आहे. हे साधन वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशाने रस्त्याची स्थिती आेळखते. हे साधन अचूक पद्धतीने काम करते. परिस्थितीनुसार वाहनाची स्थिती निश्चित करण्यास सक्षम आहे. आणखी एका साधनासाठी पाठवलेल्या पेटंटमध्ये लिहिले आहे, ‘एखादे वाहन लेन बदलत असेल तर चालकाला मदत करणारे हे साधन आहे.’ तिसरे पेटंट वाहनांची टक्कर रोखण्यासंबंधीचे आहे. हे ट्रॅव्हल कंट्रोल डिव्हाइस आहे. यामुळे वाहनाच्या खूप जवळ येणाऱ्या वस्तूचा तपशील दिला जातो.
निसान Vs भारत
- निसानने २०१० मध्ये भारतात प्रवेश केला होता. तेव्हा कंपनीने आपल्या छोट्या श्रेणीतील कार मायक्रा सादर केली होती. यानंतर २०११ मध्ये सेडान ‘सनी’ आणि २०१३ मध्ये मध्यम आकाराची एसयूव्ही ‘टेरेनो’ सादर केली.
- निसान जगातील चौथी अशी कंपनी आहे जी डॅटसन आणि इन्फिनिटी ब्रँडअंतर्गतदेखील कार विकते. भारतात निसानची होंडा, टोयोटा, फॉक्सवॅगन कारसोबत स्पर्धा आहे.
- कंपनी यंदा भारतात निसान लीफची चाचणी सुरू करेल. बाजारात लीफ उतरवण्याची योजना नाही.
- कंपनी भारतात ड्रायव्हिंगच्या गरजा पाहता इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या संधी शोधत आहे.
पुढील योजना काय?
या पेटंटला भारतात निसानच्या प्रोपायलट ऑटोनॉमस ड्रायव्हिंग सिस्टिमच्या रूपात पाहिले जात आहे. ही प्रणाली लागू झाल्यानंतर एकपदरी महामार्गावर स्वयंचलित कार चालवल्या जाऊ शकतात.
प्रकल्पाशी संबंधित महत्त्वाच्या बाबी
- या पद्धतीच्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत कंपन्या विविध देशांमध्ये विविध तऱ्हांचे पेटंट फाइल करत आहेत. प्रत्येक देशात परिस्थिती व नियम भिन्न आहेत.
- अशा पद्धतीच्या पेटंटच्या बाबतीत एक महत्त्वाचा नियम असतो की , सर्वप्रथम पेटंट अर्ज दाखल करणाऱ्यास त्याचे हक्क मिळतात. तंत्रज्ञान प्रथम देणाऱ्यांना नव्हे.
- कंपन्यांना एखादे तंत्रज्ञान नावीन्यपूर्ण वाटले तरच त्यासाठी अर्ज करतात. पेटंट मिळवणारी कंपनीच उत्पादनही सादर करेल, असे नसते. मात्र, आयपी (इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी) मालक असल्याने परवानाही दिला जाऊ शकतो.